राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. मुंबईत झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तारखेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावरुन सुरू असलेला संघर्ष, पुण्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण, कंत्राटी भरती, राज्यातील दुष्काळजन्य स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरून अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनाची वेळ वाढविण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं आहे. पण, तेलंगणामध्ये जाऊन लोचत गिरी सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकरी टाहो फोडतो आहे. सरकारने आधार द्यायला पाहिजे, पण तसे होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आमचे आमदार अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विनायक राऊतांनी दिला आहे.
दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत होती. त्यानुसार आता राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. तसेच, १९ डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनात बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सरकार अधिवेशनाबाबत गंभीर नाही- विजय वडेट्टीवार
किमान तीन आठवडे हे अधिवेशन चालावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सरकार राज्यातील प्रश्नांबाबत गंभीर दिसत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ३ आठवड्याच्या अधिवेशनाची मागणी होती. मात्र, सरकारने ३ आठवड्याऐवजी २ आठवड्याचे अधिवेशन ठेवले. अधिवेशनाबाबत सरकार गंभीर नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.