लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॅन्सर १०० टक्के बरा होतो. मात्र, त्यासाठी रुग्णाला बऱ्याच दिव्यातून जावे लागते. कर्करोगावरील उपचारांमुळे शरीराची वाताहत होते. अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे रुग्ण गलितगात्र होऊन जातो. परंतु, आता ही दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे औषध लवकरच उपलब्ध होणार आहे. द्राक्षाच्या सालीतील रेसवेराट्रोल रसायन आणि तांबे यांच्या मिश्रणातून हे औषध तयार करण्यात टाटा मेमोरिअल सेंटरमधील संशोधकांना यश आले आहे. जूनपर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
टाटा मेमोरिअल सेंटरच्या खारघर येथील अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर (अॅक्टरेक) येथील प्रख्यात संशोधक डॉ. इंद्रनील मित्रा यांनी हे औषध शोधले आहे.कर्करोगावरील उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि शस्त्रक्रिया या पद्धतीचा अवलंब केला जातो. मात्र, त्यामुळे रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम होतात.
कर्करोग पुन्हा कसा उलटतो?• द्राक्षाच्या सालीत असलेले रेसवेराट्रोल रसायन आणि तांब्यातील घटक यांच्या मिश्रणातून औषधाचा शोध त्यांनी लावला आहे. त्याचा प्रायोगिक तत्त्वावर काही रुग्णांवर वापर केला असता मृतपेशीमध्ये तयार होणाऱ्या क्रोमोसोम्सनाच हे औषध निष्क्रिय करत असल्याचे निष्पन्न झाले.या थेरपीमध्ये रुग्णाच्या २ शरीरातील कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. मात्र, या मृतपेशींमधून लहान क्रोमोसोम्स रक्तात मिसळून शरीरात इतरत्र पसरू शकतात. त्यामुळे कधीकधी कर्करोग उलटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी औषध विकसित करण्यात आले आहे.
मर्यादित प्रमाणावर या औषधाचा अभ्यास रुग्णांवर केला असता त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. जे औषध आम्ही तयार केले आहे ते बनविण्यासाठी काही औषधनिर्मात्या कंपन्यांशी संपर्क साधला असून, त्या या औषधाचे उत्पादन करणार आहे. हे औषध गोळी स्वरूपात असणार आहे, या औषधाचे आणखी काही फायदे मोठ्या अभ्यासात दिसू शकतात, मात्र ते अभ्यासाअंती कळणार आहे. विशेष म्हणजे या औषधामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिट्ठीची गरज भासणार नाही. या औषधाचा अभ्यास अजून सुरू आहे. - डॉ. इंद्रनील मित्रा, औषधाचे संशोधक
हे एक अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन आहे. येत्या काळात मोठ्या स्वरूपात या औषधाचा अभ्यास केला जाणार आहे. त्यामध्ये आणखी नवीन काही माहिती मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. - डॉ. राजेंद्र बडवे, प्रोफेसर एमिरेटस, टाटा मेमोरिअल सेंटर