दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने दुसरा पर्यायही शोधला; राजकारण आणखी तापण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:15 AM2022-09-06T09:15:20+5:302022-09-06T09:17:05+5:30
शिंदे-ठाकरे हे या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने आता हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
मुंबई- शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्याची भूमिका घेत शिंदे गटाने तसा अर्ज महापालिकेकडे केल्याने शिंदेविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे चित्र आहे. शिंदे-ठाकरे हे या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने आता हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
शिवाजी पार्कनंतर आता शिंदे गटाकडून बीकेसीतील मैदानासाठीही अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याबाबत पालिकेच्या प्रशासकांकडून नेमकी परवानगी कुणाला दिली जाते, याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. तसेच आगामी काळात राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा आपण दावा करतो तर मग दसरा मेळावा आणि तोदेखील शिवाजी पार्कवरच आपण घेतला पाहिजे, असा आग्रह समर्थक आमदारांनी शिंदे यांच्याकडे धरला. त्यातच भाजपकडून या मेळाव्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचा शब्द दिला गेला, अशी माहिती आहे.
आधीच्या अर्जावर निर्णय नाही-
ठाकरे गटाने या मेळाव्यासाठी केलेल्या अर्जावर महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नसताना शिंदे गटाचे दादर-माहीमचे आमदार सदा सरवणकर यांनी शुक्रवारी शिंदे यांच्या नेतृत्वातील मेळाव्यासाठी अर्ज केला. त्यावरून दोन्ही गटांमध्ये वाक्युद्ध सुरू झाले आहे.