शिंदे गटाला मिळतंय झुकतं माप, खरमरीत पत्र लिहून ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:38 PM2022-10-13T12:38:36+5:302022-10-13T12:39:31+5:30
Shiv Sena, Uddhav Thackeray: दरम्यान, हे नाव आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत शिंदे गटाला झुकतं माप दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला याबाबत खरमरीत पत्र लिहिण्यात आले असून त्यातून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेलं बंड आणि पक्षात पडलेली उभी फूट यानंतर आता शिवसेनेच्या दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरतं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. दरम्यान, हे नाव आणि चिन्ह देताना निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करत शिंदे गटाला झुकतं माप दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला याबाबत खरमरीत पत्र लिहिण्यात आले असून त्यातून अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला चार पानी खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप दिलं. निवडणूक आयोग आम्हाला सापत्न वागणूक देत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच आमचं पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय आधीच कसे काय उघड झाले, असा सवालही ठाकरे गटाने विचारला आहे.
या पत्रामधील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत
- निवडणूक आयोग आम्हाला सापत्न वागणूक देत आहे.
- चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप दिलं.
- शिंदेगट आणि ठाकरे गटाबाबत निवडणूक आयोगाकडून भेदभाव का?
- निवडणूक आयोग शिंदे गटाला प्राधान्य देतंय
- निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतरही शिंदे गटानं कागदपत्र सादर केली नाहीच
- शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढवत नसतानाही आमचं चिन्ह रद्द केलं
- आम्ही दिलेल्या कागदपत्रांची माहिती शिंदे गटाला कशी मिळते
- आमचं पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय आधीच कसे काय उघड झाले
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आगोगाला लिहिण्यात आलेल्या या पत्रावर शिंदे गटाकडून टीका करण्यात आली आहे. शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के म्हणाले की, तुमचा प्रायव्हेट लिमिटेड कंपू आहे. त्यामधून तुम्हीच ते नाव मागितलं होतं. मग आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका का करत आहात. निवडणूक आयोगाने एक दोन दिवसांपूर्वी निर्णय दिला. तेव्हाच निवडणूक आयोग अन्याय करतोय ते तुम्हाला कळलं नाही का. मशाल तुम्हीच मागवली होती. जाहिराती केल्यात. छगन भुजबळांना बोलायला लावलं. तुमचे प्रवक्ते बोलले. छगन भुजबळांनी पहिला विजय मिळवला तेव्हा मशाल चिन्ह होतं, हेही सांगितलं. दोन दिवस मशालीच्या बाजूने उदो उदो केला. मिरवणुका काढल्यात. आता दोन दिवसांनी तुमच्यावर अन्याय झाला ते तुम्हाला कळतंय का?, असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.