शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:26 PM2023-10-13T12:26:23+5:302023-10-13T12:26:51+5:30
दसरा मेळावा झालाच तर हे मैदान आणखी एक पर्याय म्हणून भविष्यात राजकीय पक्षांना उपयोगी पडू शकते.
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने चर्चगेट येथील क्राॅस मैदानची निवड केल्यास सर्कशींचे मैदान म्हणून ओळखल्या गेलेल्या या मैदानाला नवीनच ओळख मिळू शकेल. या मैदानात गेल्या अनेक वर्षांत राजकीय सभा किंवा मेळावे झाल्याची उदाहरणे नाहीत. दसरा मेळावा झालाच तर हे मैदान आणखी एक पर्याय म्हणून भविष्यात राजकीय पक्षांना उपयोगी पडू शकते.
शिंदे गटाने क्राॅस मैदान किंवा आझाद मैदान येथे दसरा मेळावा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. आझाद मैदानापेक्षा क्राॅस मैदान हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता अधिक आहे. हे ऐतिहासिक मैदान तीन भागात विभागले गेले आहे. त्याची क्षमता सुमारे ५० हजार लोक सामावले जाऊ शकतात एवढी आहे. हे मैदान राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. या मैदानात एके काळी मोठ्या प्रमाणावर सर्कशीचे तंबू लागत. शिवाय अधून मधून वेगवेगळी प्रदर्शने भरत; पण प्रामुख्याने ‘सर्कशीचे मैदान,’ अशीच ओळख या मैदानाची होती. काही वर्षांपूर्वी मैदानात सर्कशीचे खेळ आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली. त्याविरोधात सर्कस मालक कोर्टात गेले होते. या मैदानावर धार्मिक कार्यक्रम होतात. विविध कार्यक्रमासाठी नियमानुसार वर्षातून काही दिवस मैदान संबंधित संस्था - संघटनांना दिले जाते.
सोमय्या मैदानाचाही पर्याय
चुनाभट्टीचे मैदान हाही शिंदे गटासाठी पर्याय असू शकतो. रस्त्याच्या पूर्व भागाकडील मैदान मोठे आहे, तर रस्त्याच्या पश्चिमेकडे त्या तुलनेत लहान भाग आहे. या ठिकाणी सभा घेता येऊ शकते.
आझाद मैदान अडचणीचे
- आझाद मैदानाच्या एका भागात सध्या मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे.
- परिणामी, या मैदानात सभा घेणे फारसे सोयीचे नाही. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यास येथील व्यवस्थेचा एकूणच विचका उडू शकतो.