Join us

ढाल-तलवार मिळाल्यानंतर शिंदेगटाची पहिली प्रतिक्रिया, आनंद व्यक्त करत सांगितला चिन्हाचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 7:11 PM

Eknath Shinde: छत्रपतींची निशाणी आम्हाला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी या चिन्हामागचा अर्थही सांगितले आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही गटांनी आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला होता. दरम्यान, हा वाद निवडणूक आयोगासमोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाला मशाल हे चिन्ह दिले होते. तर आज निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे. त्यानंतर छत्रपतींची निशाणी आम्हाला मिळाली, अशी प्रतिक्रिया देत शिंदे गटाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी या चिन्हामागचा अर्थही सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नरेश म्हस्के म्हणाले की, छत्रपतींची निशाणी आम्हाला मिळाली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारावर आघात करण्याचा प्रयत्न झाला होता. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावर वार करण्यासाठी आम्हाला ही तलवार मिळाली आहे. तसेच शोषित असतील, अन्यायग्रस्त असतील, त्यांच्या संरक्षणासाठी ढाल ही निशाणी मिळाली आहे, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

तसेच शिवसैनिक हा नेहमी योद्धा असतो. तो योद्ध्यासारखा लढत असतो. बाळासाहेबांनी सांगितलंय की, तुम्ही योद्धा आहात. अन्यायावर वार करा. आज आम्हाला ही निशाणी मिळाली आहे त्याचा आम्हाला आनंद झाला आहे. बाळासाहेबांचे विचार आम्हाला महाराष्ट्रात पोहोचवायचे आहेत, असेही नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनामहाराष्ट्र