'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 12:41 PM2024-02-05T12:41:21+5:302024-02-05T12:45:49+5:30
गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपावर शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर साथीदारावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदिप सरवनकर यांच्यासह ७ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील, असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.
'ते शांत बसलेले, गणपत गायकवाड उठले, नेम धरला...'; नेमकं काय घडलं?, पोलिसांनी सांगितलं!
आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही गणपत गायकवाड यांनी केला. गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपावर शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे गणपत गायकवाड यांच्यावर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार?, कोणता निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे यांच्यासह संदीप सरवनकर यांना अटक करून त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. तसेच गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींच्या तपासासाठी ६ पथके तैनात केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे. जखमी महेश गायकवाड व राहुल पाटील यांची साक्ष घेतली नसल्याची माहितीही पाटील यांनी दिली. या घटनेचे पडसाद राज्यासह देशात उमटले असून आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सरवनकर, वैभव गायकवाड, नागेश बेडेकर, विकी गणोत्रा यांच्यासह अन्य जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.