Join us

‘नोट’ मागणाऱ्याच्या नियतमध्ये खोट; बोलण्यात गुंतवत दुकानदाराला घातला हजारोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:41 AM

सतत विरोध करूनही हा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर ठीक आहे, असे म्हणत तो ग्राहक निघून गेला.

मुंबई : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरत एका विशिष्ट नोटेची मागणी ग्राहकाने केली. तेव्हा दुकानदार ती नोट शोधण्यात गुंतला असताना कॅश काउंटरवरून हजारो रुपये लंपास केले. हा प्रकार बोरीवली पश्चिमेच्या रिलायन्स माय जिओ स्टोअरमध्ये घडल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुलमोहर रोड रायचुरा सर्कलजवळ हे स्टोअर आहे. त्या ठिकाणी रामजस यादव (२८) हे स्टोर असोसिएट म्हणून काम करतात. २१ मार्च रोजी संध्याकाळी साडेसातला काम आटोपून विक्रीतून झालेली एकूण रक्कम ५५ हजार ५०० त्यांनी मोजून ठेवले. रात्री जवळपास साडेनऊ वाजता दोन ग्राहक स्टोअरमध्ये आले आणि एकाने यादव यांना इयरफोन देण्यास सांगितले. त्यानुसार यादव यांनी विविध  इरफोन त्यांना दाखविले. ज्यात एक त्याने पसंत करत खरेदी केला. त्याची किंमत ३९९ रुपये सांगितल्यावर ग्राहकाने त्यांना २०० रुपयांच्या दोन नोटा व हेडफोन पॅक करत त्याला दिले. त्यानंतर त्या ग्राहकाने पुन्हा २०० रुपयांच्या दोन नोटा आणि १०० रुपयांची एक नोट देत त्या बदल्यात ५०० रुपयांची नोट मागितली आणि यादवने त्याला ती काढून दिली. मात्र त्या व्यक्तीने मला ही नोट नको तर आय अल्फाबेट असलेल्या सिरीजची नोट हवी आहे, असे यादवला सांगितले. मात्र, तशी नोट नसल्याचे स्पष्ट केल्यावर ग्राहकाने काउंटरमध्ये हात घालत नोटांचे गट्टे बाहेर काढून त्याला तपासायला लावले. 

सतत विरोध करूनही हा प्रकार सुरू होता आणि त्यानंतर ठीक आहे, असे म्हणत तो ग्राहक निघून गेला. त्यामुळे यादव याने पुन्हा सर्व रक्कम मोजली, त्यावेळी त्यातून १० हजार ५०० रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दोघांविरोधात बोरीवली पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :धोकेबाजी