Join us  

दिवाळीपूर्वीच निघाले दुकानदाराचे दिवाळे ! चोराने मारला अडीच लाखांचा डल्ला

By गौरी टेंबकर | Published: November 01, 2023 2:36 PM

दिवाळीचा सण असल्याने दुकानात खरेदी करण्याकरिता मित्राकडून पैसे घेतले होते.

मुंबई: दिवाळीचा सण असल्याने दुकानात खरेदी करण्याकरिता मित्राकडून पैसे घेतले होते. तसेच धंद्यातून मिळालेले पैसेही ड्रॉवरमध्ये ठेवून दुकानदार घरी निघून गेला. या दुकानाचे शटर फोडून अनोळखी चोराने एकूण २.६० लाख रुपये लंपास करून पळ काढला. या विरोधात तक्रारदार भीमसिंह राजपूत (२५) यांनी तक्रार दिल्यावर चारकोप पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.

राजपूत यांचे चारकोप परिसरात हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दिवाळीचा सण असल्याने दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांचा मित्र मिट्टू सिंग याच्याकडून २.३५ लाख रुपये घेतले होते. तसेच दिवसाभरामध्ये धंद्यातून आलेल्या पैशांपैकी २५ हजार रुपये काढून एकूण २ लाख ६० हजार रुपये त्यानी ३० ऑक्टोबर रोजी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवले आणि ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दुकानाच्या समोर नारळ पाणी विकणाऱ्या मुलाने फोन करून तुमच्या दुकानाचे शटर उचकटले आहे असे कळवले.

राजपूत यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेतली तेव्हा दुकानाचे शटर थोडे वर झाल्याचे त्यांनी पाहिले. त्यानी दुकानात जाऊन पाहिल्यावर रात्री ड्रॉवरमध्ये ठेवलेले २.६० लाख रुपये त्यांना सापडले नाही. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करवला आहे.