Join us  

टोमॅटोला महागाईची ‘लाली’! तुटवड्यामुळे भाव वाढले, मुंबईत किरकोळ बाजारात दर ९० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 8:27 AM

नवी मुंबई, मुंबई परिसरात ६० ते ९० रुपये दराने विक्री होत आहे. लवकरच दरवाढीचे शतक पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई : राज्यभर पुन्हा टोमॅटोचे उत्पादन कमी झाले असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिकिलोला ४० ते ४५ रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर वाढू लागले आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १३७ टन टोमॅटोची आवक झाली. मागणीच्या तुलनेमध्ये ५० ते ६० टन आवक कमी होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. एक आठवड्यापूर्वी टोमॅटोला ३० ते ४० रुपये दर मिळत होता. आता होलसेल मार्केटमध्ये दर ४० ते ४५ रुपयांवर पोहोचला आहे. टोमॅटो खराब होण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे किरकोळ मार्केटमध्येही टोमॅटोचे दर वाढत आहेत. नवी मुंबई, मुंबई परिसरात ६० ते ९० रुपये दराने विक्री होत आहे. लवकरच दरवाढीचे शतक पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईत पुणे, सातारा परिसरातून आवक होत आहे. 

दोन महिने दर तेजीतराज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये टोमॅटोला ३५ ते ५५ रुपये दर मिळत असून गुरुवारी चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये सर्वाधिक ७० रुपये दर मिळाला आहे. पुढील दोन महिने टोमॅटो दरात तेजी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईमध्ये सर्वाधिक विक्रीटोमॅटोची सर्वाधिक विक्री मुंबई बाजार समितीमध्ये होते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, हॉटेलमधील सलॅड, रोजच्या डब्यावरही टोमॅटोला पसंती असल्यामुळे टोमॅटोला माेठी मागणी असते. आवक नियमित असेल तर २०० टनांपेक्षा जास्त विक्री रोज होत असते. सद्य:स्थितीमध्ये १३० ते १४० टन आवक होत आहे.

पावसामुळे सर्वच भाजीपाल्यांवर परिणाम झाला असताना आता टाेमॅटाेनेही भाव खाल्ला. राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारांमध्ये ६० ते ९० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे.

टॅग्स :भाज्या