लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १२१ जीवघेणे रस्ते अपघात होऊन तब्बल १३२ जणांचे बळी गेले आहेत, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे; मात्र या अपघाताला केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन हेच एकमेव कारण नाही, तर वाहनांची नियमित तपासणी करणारी आरटीओची यंत्रणा सक्षम नाही. परिणामी फिटनेस चाचणी न केलेली वाहने रस्त्यांवर असल्यानेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आरटीओची यंत्रणा सक्षम नसण्यामागे ६० महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरीवली या चार प्रादेशिक परिवहन कार्यालयांत दररोज सुमारे ६०० वाहनांची नोंदणी होते. या वाहनांची नोंद करण्यासाठी, वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी आरटीओ कार्यालये पूर्ण क्षमतेने चालविली जाणे आवश्यक आहे; मात्र ताडदेव वगळता अन्य तीन कार्यालयांतील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (आरटीओ) पदे रिक्त आहेत.
भरीस भर म्हणून ताडदेव येथील आरटीओ भरत कळसकर यांच्याकडे परिवहन आयुक्त कार्यालयातील रस्ते सुरक्षा उपायुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ताडदेव आरटीओ कार्यालय हे राज्यातील सर्वांत अधिक उत्पन्न देणाऱ्या कार्यालयांमध्ये गणले जाते. कारण तिथे धनिकांची वस्ती असलेल्या दक्षिण मुंबईतील अत्यंत महागड्या देशी, विदेशी गाड्यांची नोंदणी केली जाते. बोरिवली आरटीओचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्याकडे अंधेरी आरटीओ अतिरिक्त कार्यभार आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त
याशिवाय मोटार वाहन निरीक्षकांची ३३, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची २२ पदे रिक्त आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. सध्या चार ‘आरटीओ’तील ६० हून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या कामाची रखडपट्टी सुरू आहे. बोरिवलीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) होते. त्याला काही महिन्यांपूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. मुंबईत आरटीओ अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त आहेत. ताडदेव कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे रिक्त आहेत.
रिक्तपदे ताडदेव अंधेरी वडाळा बोरीवली
- प्रादेशिक परिवहन अधिकारी ० १ १ १
- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी २ १ ० ०
- सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी २ ० २ ०
- मोटार वाहन निरीक्षक ४ १२ १२ ५
- सहायक मोटार वाहन निरीक्षक ४ ७ ७ ४
मुंबई दैनंदिन ६०० वाहनांची नोंदणी
रिक्त पद असल्याने जनतेला योग्य सेवा मिळत नाही, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. आवश्यक मनुष्यबळाची फारच कमतरता असल्याने जनतेसाठी त्रासदायक आहे.- सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना
सहा महिन्यांच्या कालावधीत
- १२१ - जीवघेणे रस्ते अपघात झाले.
- १३२ - जणांचे बळी गेले आहेत.
- गेल्या काही वर्षांत मोटार वाहनधारकांची बरीचशी कामे ऑनलाइन पद्धतीने केली जातात; परंतु त्याची छाननी व मान्यता ही कामे करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असते.
- नेमक्या याच कामांसाठी तिथे कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठीही या कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. शिकाऊ, कायमस्वरूपी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना (परमिट व त्यांचे नूतनीकरण आदी कामे घेऊन अनेकजण आरटीओत येत असतात.
- भरीस भर म्हणून परिवहन आयुक्त कार्यालयातीलच अनेक पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अपर परिवहन आयुक्तांचे १, सह परिवहन आयुक्तांची २, उपपरिवहन आयुक्तांची ४, सहायक परिवहन आयुक्तांची ३ पदे रिक्त असून, अन्य पदांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटर वाहन अभियोक्ता, विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.