Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहिणींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 04:19 PM2024-11-23T16:19:15+5:302024-11-23T16:44:20+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Assembly Election 2024 Results :महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. आतापर्यंत २०२४च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त बहुमत मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास ४१ जागा जिंकल्या आहेत. या मोठ्या निकालानंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
"मतमोजणी सुरु होईपर्यंत प्रत्येकजण आपला अंदाज व्यक्त करत होतं. काल तर मी स्वतः वेगवेळगळ्या चॅनेलवर पाहत होतो की, आम्ही तिघे कशातच नसल्यात जमा होतो. बाकीच्यांचे गाडी फिरवणं, ड्रायव्हिंग करणं हे सगळं सुरु होतं. कालचं चित्र पाहून आम्हाला वाटायला लागलं की आम्ही खाली जातोय की काय. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड यश दिलं आहे. त्याबद्दल मी आभार मानतो. महायुतीचे सर्वच जण राबले. आमच्या योजनांबद्दल चेष्टा मस्करी करण्यात आली. आम्ही राज्य कंगाल केल्याची टिप्पणी केली. पण त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर हे दिसलं की त्यांचा कसला हिशेब लागत नाहीये," असं अजित पवार यांनी म्हटलं.
"लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठं अपयश आलं. महाराष्ट्रात असं अपयश मिळेल असं तिघांनाही वाटलं नव्हतं. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला आणि अर्थसंकल्प सादर करताना तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे. लाडक्या बहिणींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे झालेत," असा टोला अजित पवारांनी लगावला.
"आमच्यावर आता जबाबदारी वाढली आहे. मी जसा राजकारणात आलोय तेव्हापासून महायुतीला एवढं मोठं यश आलेलं कधी पाहिलं नाही. या यशाने आम्ही हुरळून जाणार नाही. जसेजसे आकडे मला समोर दिसत होते तसे अर्थखात्याचे आकडे मला दिसत होते. मी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितले की खूप काम करावं लागणार आहे. फार आर्थिक शिस्त आणावी लागणार असून आम्ही ती आणू. आम्हाला ते नवीन नाही. आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये महायुती जोरात चालली आहे. मराठवाड्यात आम्हाला झटका मिळाला होता. पण यावेळी तसं झालं नाही. काही मोजक्या जागा केल्या ते थोड्या मतांनी गेल्या आहेत," असंही अजित पवार म्हणाले.
"विरोधक टीका करतात की बॅलेट पेपरने निवडणूक घ्यायला हवी होती. मग ती लोकसभेलाही घ्यायला हवी होती. तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं का? झारखंड आमच्या हातून गेलं आहे आम्ही काही म्हटलं का? महायुती महाराष्ट्रात जोर सगळ्याच ठिकाणी पाहण्यास मिळाल्या. सगळीकडे महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश मिळालं. जनतेच्या ऋणातच आम्ही राहू शकतो. पाच वर्षे अत्यंत एकोप्याने शेवटपर्यंत काम करेल आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीच काम करु. विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही करत आहोत, करत राहू मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो," असं अजित पवारांनी म्हटलं.