लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चाैकशीसाठी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासणी सुरू केली आहे. पथकाकडून घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या १२ हजार २४ कोटी रुपयांच्या कामांची भारताच्या महालेखापालांकडून (कॅग) चाैकशी करण्यात आली. कॅगने याचा एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात महापालिकेच्या सर्व अनियमित कामांची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, एक समिती स्थापण्यात आली असून, यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशिथ मिश्रा आणि पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्यासह आठ ते दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोमवारी पोलिस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार हे पथकासह पालिकेच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांनी, घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात केली. पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेत अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.