Join us

घाबरून जाऊ नका; पण काळजीही घ्या; कोरोना नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:15 PM

या संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून घाबरुन न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यामध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी, मॉकड्रिलच्या सूचना आणि औषधसाठा व अन्य साधनसामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला.

या संसर्गाची स्थिती नियंत्रणात असून घाबरुन न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसचे,  सूचनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा व महापालिकांना कळविण्यात आले आहे.या बैठकीमध्ये संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

राज्यात गुरुवारी ६९४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ हजार ९६ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७९ लाख ९२ हजार २२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, ही संख्या ८४६ आहे. त्या खालोखाल पुण्यात ७७३, ठाणे ५२४, रायगडमध्ये १३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस