मुंबई - मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्वाचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात जोरदारपणे मांडला.
मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढेही त्यांच्याकडे कायम राहील हे सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्याचे मान्य करत सदरची जागा मराठी भाषा विभागाकडेच राहील, तसेच या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन देत सदरचे पत्र कौशल्य विकास विभागाने परस्पर कसे दिले, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
सभागृहात बोलाताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, मराठी विकास संस्थेला मुंबईतील एल्फिन्स्टन्स तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याचे कौशल्य विकास विभागाच्या पत्रामुळे, मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या विकास संस्थेवर, महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईतच, बेघर व्हायची वेळ आली आहे. सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली गेली, आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. त्यावेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचाही विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. त्यानुसार मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.