लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रुग्णालयांत आग लागण्याच्या घटना नवीन नाहीत. त्यामुळे कायमच फायर ऑडिट करून घेण्याच्या सूचना अग्निशमन दलाकडून रुग्णालय प्रशासनाला दिल्या जातात. आगीच्या घटना रोखण्यासाठी शासनामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. या घटनांचा प्रतिबंध करण्यासाठी इंटरनेटवर आधारित अद्ययावत सॉफ्टवेअर बाजारात आले असून, ते बसविण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. विभागाच्या ११ रुग्णालयांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामध्ये जे.जे. रुग्णालयाचा समावेश आहे.
विभागाने या अद्ययावत यंत्रणेकरिता ९० कोटी ८२ लाख ७० हजार ८१७ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या यंत्रणेला तांत्रिक भाषेत आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) डिव्हाइस/ स्मार्ट ऑप्टिमायझर असे नाव देण्यात आले आहे. या यंत्रणेचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण राज्यातील रुग्णालये ही फार जुन्या काळाची आहे. त्यामध्ये केले गेलेले इलेक्ट्रिकल कामसुद्धा जुने आहे. त्यामुळे या ठिकाणी आग लागण्याचे कारण हे शॉर्टसर्किट असल्याचे सांगण्यात येते.
वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या उपकरणाच्या उपयुक्ततेबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, मुंबई महानगरपालिका यांच्याकडून खातरजमा करून घेण्यात आली आहे. अग्निशमन विभागाने आपल्या अहवालात हे यंत्र रुग्णालये आणि अनिवासी व्यावसायिक इमारतींतील विद्युत संचाच्या मांडणीत विद्युत प्रणालीमध्ये होणाऱ्या बिघाडांची पूर्वसूचना देणारे इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित सुरक्षा उपकरण असल्याचे कळविले आहे. ही यंत्रणा संगणकीय प्रणालीशी संबंधित असल्यामुळे शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागामार्फत देखील याबाबतची पडताळणी करण्यात आली आहे.
या यंत्रामुळे संच मांडणी सुरक्षित राखण्याकरिता ज्या कारणांनी शॉर्टसर्किट तसेच इतर बिघाड होऊन आग लागण्याची शक्यता आहे अशा विविध संवेदनशील बाबींचे अचूक निदान करणारे आहे. या यंत्रणेद्वारे वीज संच मांडणीच्या संरचनेमध्ये उत्पन्न होणाऱ्या असामान्य बाबीचे (फॉल्टी इलेक्ट्रिकल कंडिशन) रियल टाइमनुसार माहिती क्लाउडवर संकलित केल्यास हा डेटा पुन्हा प्राप्त करून त्याप्रमाणे संरक्षण प्रणाली कार्यान्वित करणारे आहे. त्यामुळे रुग्णालयातील विद्युत संचामधील बिघाड सदर प्रणालीमुळे तत्काळ लक्षात येऊन पुढील दुर्घटना टाळता येणे शक्य होणार आहे.
या रुग्णालयांत बसविणार यंत्रणाजे.जे. रुग्णालय, ससून रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर), डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नांदेड), नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गोंदिया), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अकोला), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (चंद्रपूर), श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (यवतमाळ).