ठाणे, तळोजातील कच्च्या कैद्यांना न्याय मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 01:59 PM2024-01-01T13:59:58+5:302024-01-01T14:00:14+5:30
या खटल्यांवर ३० मार्चपर्यंत सुनावणी होणार असून अनेक खटले निकाली निघणार आहेत.
मुंबई : विविध गुन्ह्यांतर्गत ठाणे, तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कच्च्या कैद्यांना लवकरच न्याय मिळणार आहे. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी विक्रोळी, मुलुंड आणि बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश १ जानेवारीपासून या कैद्यांसाठी तुरुंगात नियमित विशेष सुनावणी घेणार आहेत. या खटल्यांवर ३० मार्चपर्यंत सुनावणी होणार असून अनेक खटले निकाली निघणार आहेत.
मुंबईत लूटमार, चोऱ्यामाऱ्या, मारझोड, विनयभंग असे छोटे-मोठे गुन्हे करणाऱ्या आरोपींची संख्या काही कमी नाही. एफआयआर नोंदवण्यात आलेल्या या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल आहेत. आरोप सिद्ध न झाल्याने या कच्च्या कैद्यांना ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह तसेच नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. काही महिने ते तीन वर्षांपासून अंडर ट्रायल कैदी खितपत पडले असून या तुरुंगाची क्षमताही संपली आहे. तुरुंगावरील हा भार कमी करण्यासाठी कच्च्या कैद्यांच्या खटल्यावर नियमित सुनावणी घेण्याचा निर्णय मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने घेतला आहे.