मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला आता अधिकृत चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं आहे. त्यानंतर, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर तुतारी या राष्ट्रवादीच्या नवीन चिन्हाचा अनावरण सोहळाा मोठ्या उत्साहात पार पडला. तर, दुसरीकडे शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुतारी चिन्ह मिळाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावर तुतारी वाजवून आनंद व्यक्त केला. आता, खासदार सुप्रिया सुळे यांनी तब्बल ४३ वर्षांपूर्वीची जुनी आठवण सांगितली आहे.
रायगडावरील चिन्हा अनावरण सोहळ्यात स्वत: सुप्रिया सुळे यांनीही तुतारी वाजवून आनंद व्यक्त केला होता. तसेच, तुतारी ही महाराष्ट्राची शान असून विजयाचं प्रतिक असल्याचंही राष्ट्रवादीचे समर्थक नेहमी सांगत आहेत. त्यामुळे, तुतारी हे चिन्ह मिळाल्याचा आनंद शरद पवार गटाकडून केला जात आहे. सोशल मीडियाच्या आणि पत्रकारांच्या माध्यमातून आमचं चिन्ह सहजपणे लोकांपर्यंत पोहोचेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. आता, तुतारी आणि शरद पवार यांचा ४३ वर्षांपूर्वीचा जुना संबंध असल्याची एक आठवण खासदार सुळे यांनी सांगितली आहे.
सन १९८० ची आठवण
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शरद पवार यांनी जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणातून ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी पायी शेतकरी दिंडी काढली होती. जवळपास साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा हा पल्ला शेतकरी बांधवांनी साहेबांच्या सोबतीने पायी पार केला. पुढे नागपूर येईपर्यंत या दिंडीचे रुपांतर प्रचंड अशा जनसमुदायात झाले. देशपातळीवरील नेते या दिंडीत सहभागी झाले. यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, कर्पुरी ठाकूर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जॉर्ज फर्नांडिस, राजेश्वर राव, चंद्रजित यादव, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी देवीलाल, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे आदी सहभागी झाले होते.
याखेरीज कलाक्षेत्रातील संवेदनशील कलाकारांनी देखील या दिंडीला पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यामध्ये डॉ. श्रीराम लागू, गोदाताई परुळेकर,ना. धों. महानोर आदींचा समावेश होता. विशेष म्हणजे या दिंडीमुळेच शरद पवार यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. अमरावतीहून दिंडित सहभागी झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांसह त्यांना पोहरा येथे अटक करुन भंडाऱ्यातील डाक बंगल्यावर नेण्यात आले. परंतु, त्यांची लवकरच सुटका झाली आणि ते सर्वजण पुन्हा शेतकरी दिंडित सहभागी झाले. हि दिंडी म्हणजे एक प्रखर असे जनआंदोलन होते. या आंदोलनाच्या रेट्यामुळेच तत्कालिन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले साहेबांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहिर केला.
‘तुतारीचा निनाद तेंव्हाही होता; तेंव्हाही फुंकले होते संघर्षाचे रणशिंग’, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अनेक चिन्हांवर विजयी झाले शरद पवार
१९७८ मध्ये मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बरखास्त केल्यानंतरही शरद पवार दिल्लीला थेट आव्हान देत राहिले. पराभूत झाले. सोबतचे बहुतेक सगळे शिलेदार सोडून गेले, तरीही पवार लढत राहिले. आजही पवार लढताहेत. या लढाईचा निकाल काय लागेल, हे पवारांच्या हातात नाही. बैलजोडी, गाय-वासरू, चरखा, हाताचा पंजा, घड्याळ अशा विविध चिन्हांवर निवडणूक जिंकलेल्या पवारांच्या हाती वयाच्या ८४ व्या वर्षी तुतारी आली आहे. आता, हीच तुतारी आपल्या नव्या सहकाऱ्यांच्या हाती देऊन राजकीय रणशिंग फुंकले आहे.