मुंबई- मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. रविवारी सकाळी ७ वाजता ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले.
संजय राऊतांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री 'एकनाथ शिंदे अयोध्या' असं लिहिल्याचे आढळून आले होते. याबाबत आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येक पैशाचा स्त्रोत दाखवावा लागतो आणि तो संजय राऊतांकडे देखील असणार...ते हुशार, बुद्धिमान असून मुद्दाम असं काही लिहिणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा याच्याशी काही संबंध नाही, असं दीपक केसरकरांनी सांगितलं. तसेच आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमदारांना पैसे दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावर आम्ही त्यांना आमची घरं तपासून पाहा, पैसै सापडणार नाहीत असं आवाहन केलं होतं. कारण हा पैशांसाठी केलेला उठाव नव्हता, असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं.
ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊतांना आज दूपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार आहे. संजय राऊतांच्या कोर्टातील सुनावणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असेल. मात्र संजय राऊत यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्याची कारणं ईडीने सांगितली आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असहकार, बेहिशेबी रोकड जप्त आणि गुन्हेगारी दस्तऐवज पुनर्प्राप्त/ संशयास्पद कागदपत्र या तीन कारणांमुळे संजय राऊतांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.