ठाण्यातील जागा अखेर मेट्रो कारशेडसाठी देणार; मंत्रिमंडळात आज निर्णय होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:36 AM2023-09-06T07:36:31+5:302023-09-06T07:36:40+5:30
कारशेडच्या उभारणीचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार आहे.
मुंबई : चार मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी महत्त्वाच्या असलेल्या कारशेडच्या उभारणीसाठी ठाण्यातील मोघरपाडा (घोडबंदररोड) येथील १७१ हेक्टर जागा अखेर दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. या कारशेडसाठी स्थानिक आदिवासी व अन्य रहिवाशांची जमीन जाणार आहे. त्यामुळे त्यास पूर्वी विरोध झाला होता. आता भूसंपादनाच्या मोबदल्यात साडेबारा टक्के जमीन आणि मोबदला देण्याचा सिडकोचा फॉर्म्युला लागू करण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. कारशेडच्या उभारणीचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार आहे.
मुंबई फेस्टिव्हलसाठी प्राधिकरण स्थापन करणार
मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यासाठी राज्य सरकारचा पर्यटन विभाग स्वतंत्र प्रतिष्ठान स्थापन करणार आहे. प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्र हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह वीसहून अधिक नामवंत व्यक्ती या प्रतिष्ठानच्या सदस्य असतील. राज्याचे मुख्य सचिव हे या प्रतिष्ठानचे सहअध्यक्ष असतील. २००६ मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते; पण नंतर ते झाले नाही. आता दि. २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान हा महोत्सव होणार आहे. मुंबईला विश्व पटलावर आणण्याचा हा प्रयत्न असेल. प्रतिष्ठानच्या स्थापनेचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे.