मुंबई - ईडी, आयकरच्या धाडी टाकतायेत. या झोपडपट्ट्यातील मदरशावर धाडी टाका ही पंतप्रधानांना विनंती आहे. पाकिस्तानची गरजच कशाला. उद्या काय घडलं तर आतमध्येच इतकं भरून ठेवले आहे. अनेक मशिदी अशा आहेत त्यात आत काय चालू आहे कळत नाही. काय काय गोष्टी बाहेर येतील त्याने धडकी भरेल. प्रार्थनेला विरोध नाही मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी(Raj Thackeray) दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली ही लोकं आहेत. पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेल्या लोकांना आधार कार्ड, रेशन कार्ड दिले जातात. महाराष्ट्र विशेषत: मुंबईत बकालपणा आणला. चार-चार मजले बेरहाम पाड्यात उभे राहिले. मातोश्रीतून बाहेर पडल्यावर रस्ता क्रॉस केल्यानंतर बेरहाम पाडा. सत्ता असूनही काहीही घडले नाही. बेरहाम पाडे वाढले. तीच परिस्थिती मुंब्राची आहे असं सांगितले आहे.
गद्दारी केली त्यांना मतदान करू नका
अरे ला कारे म्हणणारी माणसं हवीत. कुठल्याही सत्ताधाऱ्यांची तुमच्याशी गद्दारी करायची हिंमत नाही झाली पाहिजे. कुटुंबाला हात लावू नका म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला महापालिकेत जावू नका हे सांगावं. ४ महिन्यापूर्वी ईडीची नोटीस आली तेव्हा ते गेले नाही. अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद पाहिजे होते मग भोगा. राजकारण तुम्हाला जमतं तसं समोरच्यालाही राजकारण जमते ते सोडणार नाहीत. मा. बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं. महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाला मी विरोध केला. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. महापौर बंगल्याबाहेर परदेशी लोकांच्या गाड्या लागतात. संध्याकाळी सगळी तिथेच बसतात. मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी प्लॉट सापडला नाही का? ज्या लोकांनी आमच्याशी गद्दारी केली त्यांना एकदा मतदान करणार नाही हे वचन घ्या. मी जरी असा वागलो तरी बसवा खाली. तुमचा वचक असलाच पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केला.
परप्रांतीयांवरही साधला निशाणा
ज्याने काम केले त्याला बाजूला सारलं. ज्याने काम केले नाही त्याला सत्तेवर बसवलं. मतदारांचं कौतुक वाटतं. नाशिक महापालिकेत काम करून त्याची पावती काय मिळाली? मग कोण काम करेल. लफंगेगिरी करून सत्ता मिळवायची असेल तर तेच करू. मग चांगुलपणाची अपेक्षा करू नका. रस्त्याने चालताना फूटपाथ नाही, गाड्या चालवायचा वाहतूक कोंडी आली. झोपडपट्ट्या वाढतात. १९९५ आणि आजची परिस्थिती बघा. १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आली. झोपडपट्टी वासियांना फुकटं घरे ही गोष्ट चांगली नाही असं मी मा. बाळासाहेबांना सांगितले होते. त्यांचा उद्देश चांगला होता. हेतू चांगला होता. पण त्यानंतर फुकटं घरं मिळतायेत हे पाहून लोंढेंच्या लोंढे मुंबईवर आदळले असा आरोप राज ठाकरेंनी केला.