'बेस्टच'; गणेश दर्शनाकरिता चालविण्यात येणाऱ्या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 09:53 PM2022-09-04T21:53:26+5:302022-09-04T21:54:03+5:30
शनिवारी रात्रभरात ५०० प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर ४ हजार प्रवाशांनी लाभ घेतला.
मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या गणेश दर्शनाकरिता चालविण्यात येणाऱ्या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळेस मुंबईतील विविध भागात असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडते. याचा विचार करून यंदा संपूर्ण रात्रभर गणेश भक्तांच्या प्रवासाची सोय बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आलेली आहे. सदर विशेष बस सेवेअंतर्गत खुल्या दुमजली बस गाड्या, हो हो बस योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्या तसेच संपूर्ण रात्रभर विविध बस मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष बस गाड्यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. या सेवेअंतर्गत हो हो आणि खुल्या दुमजली बस गाड्यांमधून कालच्या रात्रभरात ५०० प्रवाशांनी लाभ घेतला असून विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर ४ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते.
बेस्ट उपक्रमाने राबविलेल्या या विशेष बस सेवा मोहिमेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल बेस्ट उपक्रम मुंबईकर जनतेचा आभारी आहे. या बस सेवेला उर्वरित दिवसात देखील असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात येत आहे.