एसटी कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; महामंडळानेच बोनससाठी केली ५२ कोटींची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 06:01 AM2024-11-29T06:01:04+5:302024-11-29T06:01:35+5:30
आता आचारसंहिता संपल्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने दिवाळी भेट वितरित करावी, असे सरकारने एसटी प्रशासनाला कळविले.
मुंबई : राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्याचा निर्णय एसटीच्या संचालक मंडळाने घेतला असून आज, शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा होणार आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी भेट रक्कम मंजूर करण्यात आली होती. परंतु, आचारसंहिता आणि राज्य सरकारने निधी देण्यासाठी केलेली टाळाटाळ, आदी कारणांमुळे ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळत आहे.
दिवाळी भेट रकमेचा खर्च महामंडळाला स्वतःच्या तिजोरीमधून करावा लागणार असल्याने राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु, सरकारने ‘न’चा पाढा सुरूच ठेवल्याने आता एसटीवर ५२ कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे, असे एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारी दिवाळी भेट आचारसंहितेमुळे रखडली होती. सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी एसटी प्रशासनाने ५२ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.
त्याबाबत महामंडळाने सरकारकडे वारंवार पाठपुरावाही केला. पण सरकारी अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केले होते. आता आचारसंहिता संपल्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने दिवाळी भेट वितरित करावी, असे सरकारने एसटी प्रशासनाला कळविले. त्याचवेळी सरकारकडून ही रक्कम एसटीला मिळणार नाही असेही सांगण्यात आले. त्यामुळे सरकारने एसटी महामंडळाची फसवणूक केली आहे, अशी टीका बरगे यांनी केली आहे.
एसटीवर थकीत देण्यांचे ओझे
सध्या एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कसेबसे दिले जाते. पीएफची रक्कम वेतनातून कपात केल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ती ट्रस्टकडे भरली जात नाही. विविध प्रकारची एकूण २९०० कोटी रुपयांची देणी एसटीने थकवली आहेत.
आता आचारसंहिता संपल्यावरसुद्धा सरकार कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीची रक्कम देणार नसेल तर हे दुर्दैवी आहे. निवडणुकीत एवढे यश मिळाले आहे. आता तरी एसटीला भेटीची रक्कम द्या. एसटी सक्षम करण्याच्या फक्त गप्पा मारू नयेत. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी संघटना