मुंबई - शिंदे गटाच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांना रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गद्दार, गद्दार... म्हणत शिवसैनिकांनी भावना गवळींच्यासमोरच घोषणाबाजी केली. त्यावरुन, आता चांगलंच राजकारण घडत आहे. अकोला रेल्वे स्टेशनवर अत्यंत घाणेरडे वृत्तीने तिथे माझ्यासोबत वर्तन घडले. त्या लोकांच्या जमावात माझा जीवही गेला असता. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख या दोघांवर गुन्हे दाखल होऊन अटक झाली पाहिजे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली होती. याप्रकरणी आता शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, राज्य सरकारकडून कायदा मोडला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
माझी तक्रार मी राज्य महिला आयोग, लोकसभा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं खासदार भावना गवळींनी म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भात तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर, अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना आज राज्य सरकारवर निशाणा साधला.
अकोला रेल्वे स्थानकावर खासदार भावना गवळी यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगली घोषणाबाजी केली, त्यानंतर भावना गवळी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी टोला लगावला असून, गद्दारांचं कुणी स्वागत करता का..? असा सवाल करत राज्याचे सरकारच विनयभंग करतय असं म्हणत, विनयभंगाची व्याख्याही त्यांनी यावेळी विचारली आहे.
काय म्हणाल्या खासदार गवळी
खासदार भावना गवळी म्हणाल्या की, दरवेळीप्रमाणे अकोल्याहून मी मुंबईला येताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख जवळपास ५०-१०० जणांसह तिथे होते. मी रेल्वेत बसत असताना त्यांनी लोकांना चिथवण्याचे काम केले. त्यांना माझ्या अंगावर पाठवले. अक्षरश: ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल असं त्यांचे कृत्य होते. नीच वागणूक तिथे झाली. हे सगळं काम विनायक राऊत, नितीन देशमुख यांनी केलेय. त्यामुळे अकोला एसपींकडे मी माझी तक्रार दिली आहे असं त्यांनी सांगितले.
खरे गद्दार तुम्हीच आहात
आम्ही बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलो. आज त्यांच्यासोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडून ज्यांनी विरोधकांशी युती केली ते खरे गद्दार आहे. तुम्ही चांगले वागले नाहीत म्हणून आम्ही गेलो नाही. काल जी कृती केली ती बोलण्यापलीकडची होती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आले नाही ते बिहारला गेले. तुम्ही गद्दार आहात. तुम्हाला घर सांभाळता आलं नाही ते आमच्यावर टीका करतायेत. आधी घर सांभाळा अशा शब्दात खासदार भावना गवळींनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.