मुंबई - आपल्या देशात सुमारे 60 कोटी महिला आहेत. त्यातील सुमारे 35.5 कोटी महिलांना मासिक पाळी येते. यातील फक्त 15% मुली व महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. सुमारे 85% महिला अजूनही सॅनिटरी पॅड वापरत नाहीत. ज्यामुळे दरवर्षी कित्येक महिलांना सर्व्हिकल कॅन्सर सारखे आजार होतात. 25% मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी विलासी गोष्ट नसून ती त्यांच्यासाठी एक मूलभूत गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने दर महिन्याला धान्याप्रमाणे महिलांना सॅनिटरी पॅड सुद्धा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी वर्सोव्याच्या भाजपच्या आमदार आणि ती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती लव्हेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे
ती फाउंडेशनतर्फे आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस आणि ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँकेचा 5 वा वर्धापन दिन काल वर्सोव्यात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळेस विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळेस मासिक पाळीच्या दिवसांतील स्वच्छता याविषयी जनजागृती करण्यासाठी Walk For Cause - रॅम्प वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांच्या सोबत आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक, प्रसिद्ध गायक उदित नारायण, पोलीस उपायुक्त सुनीता साळुंखे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ अधिकारी मेघना तळेकर, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, प्रसिद्ध अभिनेत्री उपासना सेन तसेच या विभागातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
आमदार डॉ. लव्हेकर पुढे म्हणाल्या की, आपल्या समाजात मासिक पाळी या विषयावर कुणीही मोकळेपणाने बोलत नाही. मासिक पाळी या विषयाला दुय्यम स्थान दिले जाते. मुंबई सारख्या शहरामध्ये देखील मासिक पाळी दरम्यान महिला कपडा वापरतात जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे महिलांमध्ये सर्व्हिकल कॅन्सरचा धोका बळावतो.
याबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. आपण मागील अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाचे काम करत आहे. पाच वर्षांपूर्वी आम्ही ती फाउंडेशन डिजिटल सॅनिटरी पॅड बँकेची स्थापना केली. आज तिचा पाचवा वर्धापनदिन आहे. आज या संस्थेच्या 1,09,360 महिला सदस्य आहेत. या सर्व महिला सदस्यांना मोफत सॅनिटरी पॅड दरमहा दिल्या जातात तसेच 118 शाळांमध्ये ती फाउंडेशन तर्फे सर्व मुलींना दरमहा 10 सॅनिटरी पॅड मोफत दिले जातात.
तसेच महिला सदस्यांना व मुलींना मासिक पाळीच्या दिवसांत त्यांची तपासणी करणे, त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्या देणे, तसेच वेळ पडल्यास सर्व्हिकल कॅन्सर व इतर त्वचारोगांच्या प्रादुर्भावातून त्यांना बाहेर काढणे अशी कामे ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँकेच्या माध्यमातून मोफत केली जातात. तसेच या बँकेचे काम फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून अफ्रिके सारख्या देशांमध्येसुद्धा संस्थेचे काम चालते.
आम्ही सुरु केलेल्या या लोकचळवळीकरिता 2018 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मला "फर्स्ट लेडी पुरस्कार" देऊन आपला गौरव केला होता. आपल्या भारत देशात मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड याविषयी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सुद्धा त्यांनी देशातील महिलांनी सॅनिटरी पॅड वापरणे व महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असणे किती गरजेचे आहे, याचा उल्लेख केला होता.तसेच त्यांनी मासिक पाळी स्वच्छतेचा त्यांनी स्वच्छ भारत अभियानात समावेश केला. तसेच प्रत्येक जेनेरिक औषधालयात 1 रुपया दराने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले. ज्याचा देशातील पाच कोटी महिलांना लाभ झाला याबद्धल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
आमदार विनायक मेटे म्हणाले की, महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबाबत आपल्या समाजामध्ये फार पूर्वीपासून दुय्यम दर्जाची भावना राहिली आहे. आपल्या समाजामध्ये मासिक पाळी आलेल्या मुली व महिलांना सर्वांपासून वेगळे ठेवले जाण्याची परंपरा व रूढी फार पूर्वीपासून सुरु आहे, जे पूर्णपणे चूकीचे आहे. खरे सॅनिटरी पॅड हा ज्या प्रकारे महिलांच्या आरोग्याशी निगडित महत्वाचा विषय आहे, तसाच जुन्या चालीरिती, परंपरा, अंधश्रद्धा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. या परंपरा मोडण्याची आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या मध्ये घरच्या मोठ्या महिलांसोबत घरातील पुरुषांनीसुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.