मुंबई - राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. त्यामुळे, विधिमंडळ अधिवेशनात या संपाचे पडसाद उमटताना दिसून येते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संपावर तोडगा काढण्याची मागणी विधानसभेत केली. त्यानंतर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच, ज्या संघटनांनी संपातून माघार घेतली, त्यांचे आभारही फडणवीसांनी मानले.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदनही केले. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यावरुन, आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारला प्रश्न विचारला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत संप मागे घेण्याचं आवाहन केलंय.
संप मागे घ्या, हे राज्य आपलं आहे, अशी भावनिक साद फडणवीसांनी सरकारी कर्मचाऱ्यांना घातली. तसेच, संपातील काही संघटनांनी आठमुठी भूमिका घेतली आहे. काही संघटनांनी संपातून माघार घेतली. प्राथमिक शिक्षक संघटनेने सरकारची भूमिका मान्य केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही भूमिका मान्य करत समितीसमोर बाजू मांडण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे, या सर्वांचे मी आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यासोबतच, अनेकांनी आपलं दायित्व समजून काम सुरू केलंय, विद्यार्थ्यांच्या परिक्षा व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे, या सर्वांचे आभार मानतो, असेही फडणवीसांनी म्हटले. तर, संप मागे घ्यावा, समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं, समितीचा जो अहवाल येईल, त्यानुसार निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
१८ लाख कर्मचारी संपावर
जुन्या पेन्शनसाठी आम्ही सरकारला अनेक निवेदने दिली. चर्चाही खूप झाल्या आहेत. पण कोणताही अंतिम निर्णय सरकरने केला नाही. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळेच राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जात असल्याची घोषणा कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी येथे केली. या संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये यासह अनेक सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजपासून या संपाचे परिणाम जाणवत आहेत.