वादळामुळे दोरखंड तुटून बोट उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:44 AM2022-01-24T07:44:20+5:302022-01-24T07:44:43+5:30
पूर्वकल्पना न दिल्याचा मच्छीमारांचा आरोप
मीरा रोड : अचानक पाऊस आणि वादळी वारा सुटल्याने भाईंदरच्या समुद्रात नांगरलेल्या चार मच्छीमार बोटींचे दोरखंड तुटून त्या किनाऱ्यावरील खडकांवर आदळल्या. त्यात एक बोट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शनिवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर जोरदार वादळी वारे वाहू लागले. मध्यरात्री १ च्या सुमारास उत्तनच्या भुतोडी बंदर येथील जीवनशक्ती ही मोठी मच्छीमार बोट समुद्रातील नांगरचा दोरखंड तोडून किनाऱ्यावरील खडकांना आदळली. खडकांवर सातत्याने धडकत राहिल्याने तिचे तुकडे झाले. बोटीच्या इंजिनपासून अनेक सामान बुडाले आहे. सबेस्टीन सायमन चिंचक या नाखवाची ही बोट असून, बोटीच्या तुकड्याला बिलगून कुटुंबातील महिला ओक्साबोक्सी रडत होत्या. जीवनशक्ती बोटीवर चार खलाशी होते. नांगराचा दोर तुटल्याने बोट जोरात हेलकावे खात होती. यामुळे चौघेही खलाशी बाहेर पडले.
नगरसेविका शर्मिला गंडोली, स्थानिक मच्छीमार नेते माल्कम कासुघर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील मच्छीमार मोठ्या संख्येने एकत्र जमून बोटीचे तुकडे, इंजिन, समान, जाळी जे सापडेल तसे बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. याशिवाय भुतोडी बंदरातील ग्रेगरी साकोल यांची प्राजक्ता ही फायबर बोट, तर पाली येथील संजय सोज यांची ईश्वरदूत बोट वाऱ्यामुळे दोरखंड तुटून किनाऱ्याला येऊन धडकल्या. चौक बंदरमधील बसत्याव मुंबईकर यांची जॉन पॉल ही बोटसुद्धा किनारी धडकली. पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी असल्याने बहुतांश बोटी या किनाऱ्यापासून काही अंतरावर समुद्रात नांगरुन ठेवलेल्या होत्या.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्याची पूर्वकल्पना मिळालेली नव्हती. नुकसान झालेल्या मच्छीमारांना शासनाने अर्थसाहाय्य केले पाहिजे.
- बर्नड डिमेलो, मच्छीमार नेते