कहाणी आधुनिक नवदुर्गेची : किरण कनोजिया... पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण ! 

By संतोष आंधळे | Published: September 29, 2022 06:08 AM2022-09-29T06:08:39+5:302022-09-29T06:09:07+5:30

भारतातील पहिली महिला ‘ब्लेड रनर’

The Story of Modern Navdurga first indian blade runner Kiran Kanojia A ray of hope for those who have lost their legs | कहाणी आधुनिक नवदुर्गेची : किरण कनोजिया... पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण ! 

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : किरण कनोजिया... पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण ! 

Next

मुंबई : २४ डिसेंबर २०११ हा दिवस तिच्या आयुष्यातला खास आठवणीतला. २५वा वाढदिवस घरच्यांसोबत साजरा करण्यासाठी हैदराबादेतून दिल्लीला ती जात होती. दिल्ली स्टेशन अगदी जवळच होते. म्हणून दारात उभी राहिलेली. डोळ्यात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे स्वप्न होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असावे. ट्रेनच्या दाराजवळ उभ्या असलेल्या तिच्यावर दोन गुंडांनी हल्ला केला. तिच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. झटापटीत ती रुळांवर पडली. जबर जखमी झाली. जिवावरचे पायावर निभावले. परंतु पाय कायमचा गेला तरीही ती जिद्दीने उभी राहिली. आज तिची ओळख आहे भारताची पहिली महिला ‘ब्लेड रनर’ अशी. कोणत्याही कारणास्तव पाय गमावलेल्यांसाठी आशेचा किरण बनलेली ती आहे किरण कनोजिया...

हरयाणातील फरिदाबाद शहरात राहणारी किरण मध्यमवर्गीय कुटुंबातली. अभ्यासू आणि शांत अशी मुलगी अशी तिची ओळख. कपडे इस्त्री करण्याचा वडिलांचा व्यवसाय. घरातील परिस्थिती तशी बेतास बातच. परंतु तरीही किरणच्या वडिलांनी तिला मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) पदवीपर्यंतचे शिक्षण दिले. वडिलांना हातभार लावण्यासाठी किरणने शिक्षणानंतर नोकरी करण्याचे ठरवले. हैदराबादेतील एका कंपनीत तिला कम्प्युटर इंजिनीअर म्हणून नोकरीही मिळाली. चांगले दिवस आले. २४ डिसेंबर २०११ रोजी ती हैदराबादहून दिल्लीला जाण्यास निघाली. दुसऱ्या दिवशीचा वाढदिवस कुटुंबीय तसेच मित्रमैत्रिणींबरोबर साजरा 
करण्याचा किरणचा बेत होता. मात्र, नियतीने घात केला. 

किरण यासंदर्भात सांगते, ‘त्या दिवशी पोलिसांनीच मला रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीयांशी संपर्क साधला. पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एक लाख रुपये लागणार होते. वडिलांनी कसेबसे पैसे जमविले. तोपर्यंत रात्र झाली होती. पाय काढावा लागेल, त्यासाठीची संमती घेण्यासाठी डॉक्टर माझ्याकडे आले. वाढदिवसाला सुरुवात झाली होती. एकीकडे मोबाइलवर वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश येत होते आणि मी माझ्या आयुष्यातला एक कटू निर्णय घेत होते.’ 

पाय गमावल्यानंतर...
किरण पुढे सांगते, एक पाय गमावल्यानंतर पुढील बरेच महिने मी सुन्न मानसिकतेत होते. वडिलांनी प्रख्यात नर्तकी सुधा चंद्रन यांचे उदाहरण देत मला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला. पुढे मी हैदराबादेतील रिहॅबिलिटेशन सेंटरला गेले. तिथे मला प्रोस्थेसिस लावण्यात आले. मात्र, त्याचा सारखा त्रास होत होता. मी डॉक्टरांना तसे बोलूनही दाखवले. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, तुला धावायचे थोडीच आहे. त्यावेळी मी विचार करून हो असे उत्तर दिले. डॉक्टरांनीही मग साथ दिली. सी आकाराच्या प्रोस्थेसिसशी माझी ओळख करून दिली. त्यास ‘ब्लेड’ असे म्हणतात. त्यावर मी सराव करू लागले. सरावानंतर धावण्याची जिद्द निर्माण झाली. मला देशासाठी पॅरा ऑलिम्पिक खेळण्याची इच्छा आहे.’

Web Title: The Story of Modern Navdurga first indian blade runner Kiran Kanojia A ray of hope for those who have lost their legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे