कहाणी आधुनिक नवदुर्गेची : बालवधू ते उद्योजिका डॉ. कल्पना सरोज होण्याचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 11:32 AM2022-09-28T11:32:42+5:302022-09-28T11:33:52+5:30
नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...
योगेश बिडवई
मुंबई : वडिलांकडे हट्ट करून शाळेत प्रवेश घेतला, मात्र आठवीत असताना शिक्षण अर्धवट सुटून १२ व्या वर्षीच बालविवाह झाला. मुंबईत सासरच्या मंडळींनी राब राब राबवून घेतले. केस विंचरले तरीही टोमणे मारले जायचे. झोपडपट्टीतील छोट्याशा घराबाहेरचं जग माहिती नव्हतं. वडील एकदा भेटायला आल्यावर तिने हंबरडाच फोडला. मुलीच्या यातना पाहून ते तिला गावी घेऊन गेले. गावातही लोक बोलू लागले. त्यातून थेट विषप्राशनच करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. तेथूनच मग जगून दाखविण्याचा संघर्ष सुरू झाला... प्रसिद्ध उद्योजिका डॉ. कल्पना सरोज होण्याचा प्रवास आकाराला आला.
११६ कोटींचे कर्ज असलेला कमानी ट्युब्ज लिमिटेड हा २० वर्षे गाळात फसलेला उद्योग कर्जातून बाहेर काढून पुन्हा यशस्वीपणे चालविला. कल्पना ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या अधिपत्याखाली सध्या एकूण सात कंपन्या कार्यरत आहेत. त्यातून शेकडो कोटींची उलाढाल होते. ५०० वर कर्मचारी यात काम करत आहेत. उत्पादन, कृषी उद्योग, रिअल इस्टेट, निर्यात, आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रात त्यांचे काम चालते. पद्मश्री पुरस्कार, अमेरिकेतील विद्यापीठाची डी.लिट., आयआयएम बंगळुरूच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. हा प्रवास म्हणजे केवळ नशीब नव्हे तर ध्येयाची, कष्टाची आणि स्वत:वर असलेल्या अढळ विश्वासाची यशोगाथा आहे. त्यांच्या कंपनीच्या नावाने मुंबईत दोन मार्गही आहेत.
अकोला जिल्ह्यातील रोपरखेडा या गावी त्यांचा जन्म झाला. वडील पोलीस कॉन्स्टेबल होते. विषप्राशनातून वाचल्यानंतर त्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे ठरविले. गावात शेती नव्हती. मजूर म्हणून काम करायचे नव्हते. आईच्या मागे लागून १६ व्या वर्षी कल्पना सरोज मुंबईत काकाकडे आल्या. लोअर परळ भागात एका होजिअरी कंपनीत काम करू लागल्या. ६० रुपये महिना होता. त्यानंतर अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठीच्या योजनेतून कर्ज घेऊन वस्त्रनिर्मिती तसेच फर्निचर निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता बांधकाम उद्योगापासून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी पाय रोवले. दक्षिण मुंबईत फोर्टमधील बॅलॉर्ड पिअर भागात त्यांच्या कंपनीचे प्रशस्त कार्यालय आहे. दिवसाचे १६-१६ तास काम करतात. दलित चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
हृदयात प्रेम, करुणा हवी
दलित-बौद्ध कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला आले. लहानपणी अनेक दु:खं सोसली, अत्याचार झाले. मात्र आई वडिलांमुळे मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. मी केवळ कुटुंबाचाच आधार बनले नाही, तर उद्योजिका बनून समाजासाठीही काम करू शकले. बाईने घराचा उंबरठा ओलांडला, तर ती काहीही करू शकते. तिच्यात स्वत:ला सिद्ध करण्याची शक्ती आहे. बाई दुर्गाच आहे. मला अनेक जण बुद्ध कन्याही म्हणतात. आपण माणसं आहोत. आपल्या हृदयात प्रेम आणि करुणा असली पाहिजे. एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून नागपूरमध्ये काम सुरू होत आहे. तेथे एव्हिएशन कॉलेजही सुरू होत आहे.
डॉ. कल्पना सरोज,
प्रसिद्ध उद्योजिका