कहाणी आधुनिक नवदुर्गेची : संकुचित नजरांना ‘करारा जवाब’ देणाऱ्या लेफ्टनंट गौरी महाडिक

By मनोज गडनीस | Published: September 27, 2022 06:58 AM2022-09-27T06:58:57+5:302022-09-27T07:00:32+5:30

नवरात्रीच्या निमित्ताने लोकमत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला ओळख करून देणार आहे. या सदरातून आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

The Story of Modern Navdurga navratri 2022 spacial Lt Gauri Prasad Mahadik Wife of Martyr Major Prasad Joins Army | कहाणी आधुनिक नवदुर्गेची : संकुचित नजरांना ‘करारा जवाब’ देणाऱ्या लेफ्टनंट गौरी महाडिक

कहाणी आधुनिक नवदुर्गेची : संकुचित नजरांना ‘करारा जवाब’ देणाऱ्या लेफ्टनंट गौरी महाडिक

googlenewsNext

मुंबई : ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता सीमेवर निधड्या छातीने उभा राहणारा, समरप्रसंगात शत्रूला करारा जवाब देणारा जवान हा देशाचा अभिमान. शत्रूशी लढताना जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. विशेषत: शहीद जवानाच्या विधवा पत्नीला कुचंबणा सहन करावी लागते. समाज त्यांच्याकडे संकुचित नजरांनी पाहू लागतो. मात्र, याच संकुचित नजरांना करारा जवाब दिला आहे लेफ्टनंट गौरी महाडिक यांनी.

गौरी यांचे पती मेजर प्रसाद महाडिक यांना अरुणाचल प्रदेशात सीमेचे रक्षण करतेवेळी वीरमरण आले. त्यावेळी त्यांच्या लग्नाला अवघे दोन वर्ष १० महिने झाले होते. मेजर महाडिक यांच्या हौतात्म्यानंतर गौरी यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले. कंपनी सेक्रेटरी आणि कायदा असे दोन्हीचे शिक्षण घेतलेल्या गौरी यांच्याकडे मुंबईत उत्तम नोकरी होती. परंतु जेव्हा ही दुःखद घटना घडली, त्यानंतर त्यांना समाज म्हणून आलेले अनुभव समाजाचा संकुचितपणा अधोरेखित करणारे होते.

लेफ्टनंट गौरी सांगतात, ‘आपल्या समाजात ज्या महिलेच्या पतीचे निधन होते, तिला आजही विधवा संबोधले जाते. अनेक कार्यक्रमांत तिला वेगळी वागणूक दिली जाते. त्यामुळे त्या महिलेच्या मनावर काय ओरखडे उमटत असतील, याचा विचार करण्याचीही गरज कुणाला वाटत नाही किंवा आता ही एकटी बाई म्हणजे सर्वांनाच उपलब्ध, असेही लोकांना वाटते. विधवेने चाकोरीच्या नियमातच राहायला हवे, असा अट्टहास असतो. या उलट ज्या पुरुषाच्या पत्नीचे निधन झाले आहे, त्याला कोणतेही बिरूद लावून त्याला उल्लेख होत नाही किंवा कथित चाकोरीचे नियम त्याला लागू होत नाहीत. हे चक्र तोडायचे होते. त्यासाठी काहीतरी वेगळे करण्याची गरज मला वाटली आणि त्याची सुरुवात मला माझ्यापासून करणे सयुक्तिक वाटले.’ 

पतीचा देशसेवेचा वसा स्वीकारला ! 
पती मेजर प्रसाद यांचा देशसेवेचा वसा गौरी यांनी स्वीकारला. त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्धार केला. गौरी यांनी सैन्यभरतीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन गौरी सैन्यात दाखल झाल्या. एका शहिदाच्या पत्नीने किंबहुना एका विधवेने तिच्याकडे संकुचित नजरेने बघणाऱ्या नजरांना दिलेले हे एक उत्तर होते, असे मला ठामपणे वाटते, असे लेफ्टनंट गौरी नमूद करतात. 

प्रसाद यांची या देशावर, कर्तव्यावर नितांत श्रद्धा होती. त्यांचा हाच वसा मी पुढे न्यायचे ठरवले आणि सैन्यात दाखल झाले. चेन्नईचे ते खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ज्यावेळी मी लष्करात ‘लेफ्टनंट’ पदावर कमिशन्ड झाले, त्यावेळी माझ्या परिघातील सर्वांचा ऊर तर अभिमानाने भरून आलाच पण विधवा किंवा घटस्फोटित महिलांना चाकोरीत बसवू पाहणाऱ्या नजरांना पण ते सणसणीत उत्तर होते. आज मला अनेक मुली, महिला मेसेज करतात, भेटतात. त्यांचे मन मोकळे करतात. माझ्या परीने मला त्यांच्या मनात जेवढी उमेद भरता येईल ती मी भरते.      
लेफ्टनंट गौरी महाडिक

Web Title: The Story of Modern Navdurga navratri 2022 spacial Lt Gauri Prasad Mahadik Wife of Martyr Major Prasad Joins Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.