पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : इराण्याच्या हॉटेलमध्ये पाडगावकरांच्या ‘जिप्सी’चा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 13:30 IST2025-01-26T13:24:02+5:302025-01-26T13:30:23+5:30

एका संध्याकाळी भालचंद्र देसाई आणि मी, पाडगावकरांसोबत इराण्याच्या त्या हॉटेलमध्ये चहा, ब्रून मस्का घेत असताना त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाचा विषय निघाला. मी उत्साहाने ‘पॉप्युलर’तर्फे स्वखर्चाने त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाबद्दल विचारले...

The story of the birth of the book | पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : इराण्याच्या हॉटेलमध्ये पाडगावकरांच्या ‘जिप्सी’चा जन्म

पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : इराण्याच्या हॉटेलमध्ये पाडगावकरांच्या ‘जिप्सी’चा जन्म

रामदास भटकळ |

साहित्यप्रेमी विद्यार्थी म्हणून माझी मुंबईतच मुशाफरी चालायची. एकदा मी भालचंद्र देसाईंसोबत हिंडत असताना काँग्रेस हाऊस जवळील जिना हॉलमध्ये कविसंमेलनात डोकावलो. त्यात गिरीश, यशवंत, संजीवनी मराठे यांचे बहारदार काव्यगायन ऐकले. यापूर्वी मी गिरीशांची ‘भलरी’ ही कविता चाल लावून ‘गंमतजंमत’ मध्ये आकाशवाणीवर म्हटली होती. याच कार्यक्रमात मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तरुण कवींना ऐकायला मिळाले. पाडगावकरांची ‘जिप्सी’ आणि ‘लारलप्पा’ किंवा ‘अहो जग पुढे गेले’ ही कविता, ती म्हणण्याची, त्यांची गायनाऐवजी वाचनाची पद्धत आणि श्रोत्यांचा प्रतिसाद याने मी हुरळून गेलो. ती कविता गुणगुणतच मी घरी पोहचलो. 
त्या सुमारास भालचंद्र देसाई यांनी मला ‘मौज’ साप्ताहिकाच्या कार्यालयात नेले होते. नाहीतरी त्या मुद्रणालयात आमची छपाईची कामे होत असत. ‘सत्यकथे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पाडगावकरांच्या अनेक कविता मी वेळोवेळी वाचलेल्या होत्या. तिथे पाडगावकरांची प्रत्यक्ष भेट होत असे. कोणाही लेखक-कवीला आपल्या लेखनाची प्रशंसा ऐकायला आवडते. त्यातून मी खरोखर पाडगावकरांच्या याच नव्हे तर इतरही कवितांवर भाळलो होतो. त्यांच्या कवितेत, त्या सुरुवातीच्या काळात अनेक वेगवेगळे भाव व्यक्त होत असत. तरुण मनाला लोभावत असत. उदाहरणार्थ ‘थेंब’ नावाची त्यांची अगदी छोटी कविता (‘मनात नाही मुळीच माझ्या काही, फक्त वाजते आहे नितळ लाजरे एक पाऊल थेंबाचे) ही माझ्यातील प्रेमिकाला गुदगुल्या करत असे. सहसा मला कविता पाठ होत नाही; परंतु ही छोटी कविता मात्र माझ्या मनात रुतून बसली.

‘मौज’ कार्यालयातून बाहेर पडल्यावर आमचा कधी वेलणकर उपाहारगृहात मिसळ किंवा निदान व्हाईसरॉय ऑफ इंडिया या इराण्याच्या दुकानात सिंगल चहा व्हायचा. एका संध्याकाळी भालचंद्र देसाई आणि मी, पाडगावकरांसोबत इराण्याच्या त्या हॉटेलमध्ये चहा, ब्रून मस्का घेत असताना त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाचा विषय निघाला. त्यांचा पहिला संग्रह ‘धारानृत्य’ महादेवशास्त्री जोशी यांच्या ज्ञानराज प्रकाशनाने प्रसिद्ध केला होता. पण, त्याचा भुर्दंड पाडगावकरांनाच पडला होता. मी उत्साहाने ‘पॉप्युलर’तर्फे स्वखर्चाने त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाबद्दल विचारले. त्यांनी लगेच होकार दिला.

त्यांच्या ज्या काही कविता काव्यवाचनाच्या कार्यक्रमांतून गाजत होत्या त्यापैकी ‘जिप्सी’ ही एक महत्त्वाची होती. त्यात त्यांच्या मनाचे स्वच्छंदी चित्र उमटले होते, तेव्हा ते शीर्षक ठरले. कवितासंग्रहाच्या बाबतीत कवितांचा क्रम महत्त्वाचा असतो. पाडगावकर हे प्रा. वा.ल. कुळकर्णी यांचे विल्सन हायस्कूलमधील विद्यार्थी. त्यांचीच मदत घ्यायचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवितांची निवड आणि क्रम ठेवला गेला. ‘मौज’चे संपादक श्री.पु. भागवत यांना  पाडगावकरांबद्दल विशेष प्रेम. तेव्हा त्यांनी पुस्तकाच्या मुद्रणात चूक राहणार नाही याची काळजी घेतली. प्रस्तावनेसाठी वा.ल. कुळकर्णी यांचा आशीर्वाद होताच.

वेष्टनासाठी चित्र दीनानाथ दलालांनाच विचारायचे ठरले. आम्ही गिरगाव चौपाटी जवळच्या दलालांच्या स्टुडिओत गेलो. तिथे ‘जिप्सी’ कविता म्हणून दाखवायची कवीची तीव्र इच्छा होती. पण, दलालांचा अनुभव आणि हट्ट अगाध. त्यांनी कविता ठेवून जा, असे परत परत सांगून पाडगावकरांना कविता म्हणू दिली नाही. कदाचित त्यामुळे त्यांना मनासारखे चित्र सुचेना. तेव्हा त्यांनी चित्र न काढता एक अब्स्ट्रॅक्ट रचना केली. दलालांचा कुंचला इतका प्रभावी की त्या अमूर्त चित्रामुळे पुस्तक अत्यंत सुरेख दिसू लागले.

या कवितासंग्रहाचे अपूर्व स्वागत झाले. वृत्तपत्रांतून त्यावर संपादकीये प्रसिद्ध झाली. पाडगावकर तेव्हा ‘साधना’चे संपादकीय काम सांभाळत असत. त्यांना काव्यवाचनासाठी आमंत्रणे येऊ लागली. कार्यक्रमानंतर श्रोत्यांना पुस्तक विकत घ्यावेसे वाटायचे. किंमत फक्त तीन रुपये होती. पाडगावकर स्वतः प्रती घेऊन जायचे. तीन महिन्यांत पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली. यशस्वी प्रकाशकाने कविता प्रकाशनाच्या भानगडीत पडू नये ही भीती पळून गेली. त्यानंतर पॉप्युलर कवितांचे प्रकाशक म्हणून नावाजले गेले. पाडगावकरांचीच दहा कवितांची पुस्तके आम्ही प्रकाशित केली.

Web Title: The story of the birth of the book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.