मुंबईत १५० वर्षांपूर्वी धावलेल्या ‘ट्राम’ची कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:43 PM2024-05-20T12:43:15+5:302024-05-20T12:44:18+5:30
...जसे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिकेची इमारत, क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट परिसरातल्या ब्रिटिशकालीन इमारती आणि काय काय आणि किती किती. मात्र, अभिमानाने मिरवाव्यात अशा आठवणी काळाच्या ओघात नष्टही झाल्या. अशा अनेक आठवणींपैकी एक म्हणजे मुंबईतली ट्राम सेवा.
विनय उपासनी, मुख्य उपसंपादक -
कहीं बिल्डिंग, कहीं ट्रामें,
कहीं मोटर, कहीं मिल...
मिलता है यहाँ सबकुछ,
मिलता नहीं दिल...
१९५०च्या दशकातल्या मुंबईचे अचूक वर्णन करणाऱ्या गाण्याच्या या ओळी, ‘सीआयडी’ सिनेमातल्या. ७४ वर्षांनंतर आजच्या मुंबईचे वर्णन करायचे झाले तर ते ‘कहीं टॉवर, कहीं मेट्रो, कहीं मोनो, कहीं मॉल...’ असे करावे लागेल. बदलत्या काळाच्या या झपाट्यात मुंबईने अनेक जुन्यापुराण्या खुणा आजही जपल्या आहेत. जसे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिकेची इमारत, क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट परिसरातल्या ब्रिटिशकालीन इमारती आणि काय काय आणि किती किती. मात्र, अभिमानाने मिरवाव्यात अशा आठवणी काळाच्या ओघात नष्टही झाल्या. अशा अनेक आठवणींपैकी एक म्हणजे मुंबईतली ट्राम सेवा.
मुंबई आणि ट्रामचे नाते
मुंबईत ट्रामची कल्पना पुढे आली १८७१ मध्ये. त्याआधी घोडागाड्यांची चलती होती. आदल्या वर्षी, म्हणजे १८७० मध्ये लंडनमध्ये घोड्याच्या ट्रामगाड्यांना सुरुवात झाली होती. हाच प्रयोग मुंबईतही करून पाहू, म्हणून इंग्रजांनी घोड्याच्या ट्रामगाड्या सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार १८७३ मधे बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. ९ मे १८७४ ला मुंबईच्या रस्त्यावर पहिली ट्रामगाडी धावली. सुरुवातीला कुलाबा-क्रॉफर्ड मार्केट-पायधुणी आणि बोरिबंदर-काळबादेवी-पायधुणी या दोन मार्गांवर ट्रामगाडी धावू लागली. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या या ट्रामगाड्यांना त्या काळात लोकांनी खूप विरोध केला. त्यामुळे ट्रामगाड्यांना सुरुवातीच्या काळात अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, हळूहळू ट्रामगाड्यांना होणारा विरोध मावळून ट्राम गर्दीने फुलू लागल्या. कुलाबा ते पायधुणी या प्रवासासाठी त्या काळात तीन आणे लागायचे. किफायशीर सेवा म्हणून लोकांनी ट्रामगाड्यांवर शिक्कामोर्तब केले. १८७४ ते १९०५ या कालावधीत ससून डॉक, वाडी बंदर, लालबाग, जेकब सर्कल, कर्नाक बंदर, धोबी तलाव, जे.जे. हॉस्पिटल, ग्रँट रोड या भागांपर्यंत ट्रामचा विस्तार झाला.
विजेवरची ट्राम
१९०५ मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी अर्थात बेस्टची स्थापना झाली. बेस्टने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेऊन विजेवर चालणाऱ्या ट्रामगाड्या मुंबईत आणल्या. ७ मे १९०७ ला विजेवर चालणारी पहिली ट्राम मुंबईत धावली. पालिका मुख्यालय ते क्रॉफर्ड मार्केट एवढाच या ट्रामचा प्रवास होता. १९२० पासून दुमजली ट्राम मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागल्या. ट्रामची धाव दादरपर्यंत गेली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ते दादर या ट्रामच्या प्रवासासाठी दीड आणे लागायचे त्या काळात. दादरपर्यंत आलेली ट्राम नंतरच्या काळात माटुंग्यापर्यंत धावू लागली. ट्रामगाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्या अधिकाधिक रस्त्यांवर धावतील, अशा पद्धतीने महापालिका प्रयत्न करू लागली. तोपर्यंत प्रवासाची साधने वाढू लागली होती. बग्ग्या, बस, लोकल, टॅक्सी, खासगी वाहने यामुळे ट्राम हळूहळू मागे पडू लागली आणि ३१ मार्च १९६४ ला ट्रामने मुंबईचा निरोप घेतला. आताच्या घडीला ट्रामचे भारतातले अस्तित्व फक्त कोलकात्यापुरतेच मर्यादित आहे. मुंबईत ट्राम पुन्हा अवतरली तर तिचे नक्कीच स्वागत करतील मुंबईकर...