Join us

काँग्रेसच्या शायर उमेदवाराला पाठिंब्याचे बळ अन् नाराजीचीही झळ; पृथ्वीराज चव्हाण यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 6:25 AM

उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांची ही शायरी. आज त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : सौ झूठ पे एक सच भारी है हर दौर मे सच के साथ रहे शायर की जिम्मेदारी है मै आग से लडने निकला हू अंगारों से क्या डरनामै शायर हू एक शायर को सरकारों से क्या डरना ...

उत्तर प्रदेशातील प्रख्यात उर्दू कवी इम्रान प्रतापगढी यांची ही शायरी. आज त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारीच्या निमित्ताने काँग्रेसमधून त्यांना पाठिंब्याचे बळ मिळाले अन् नाराजीची झळही सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. सरकारला न घाबरता शायरीतून खडे बोल सुनावणाऱ्या इम्रान यांना नाराजीचे बोल ऐकावे लागत आहेत.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी इम्रान यांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले. एका राज्यातील नेते दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर जातात यात नवीन काहीही नाही. आपले मुकुल वासनिक राजस्थानमधून उमेदवार आहेत. इम्रान प्रतापगढी हे तरुण, उत्साही आहेत, आम्ही सगळे त्यांना निश्चितपणे निवडून आणू, असे पटोले आणि थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.

नगमा यांची टिट्वनाराजीअभिनेत्री नगमा यांनीही इम्रान यांच्या उमेदवारीबद्दल ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली. मी २००३-०४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा सोनियाजींनी मला राज्यसभेत पाठविण्याचा शब्द दिला होता. आता त्याला १८ वर्षे झाले, पण संधी मिळाली नाही. इम्रान यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली गेली. माझ्यात काय उणीव आहे? माझी १८ वर्षांची तपस्या कमी पडली, या शब्दांत नगमा यांनी नाराजीचा सूर आळवला.

पृथ्वीराज चव्हाण यांची तक्रारमाजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, तसे का करण्यात आले हे आपल्या आकलनापलीकडचे आहे.  इम्रान यांना उत्तर प्रदेशातून, तर मुकुल वासनिक यांना राजस्थानएवजी महाराष्ट्रातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी मी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

काँग्रेस श्रेष्ठींची समज!इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजताच अस्वस्थ झालेल्या राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनी लगेच दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींच्या कानावर नाराजी घालण्याचे ठरविले होते. तथापि, दिल्लीत येण्याची गरज नाही. पक्षश्रेष्ठींनी इम्रान यांचे नाव नक्की केले आहे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या, अशी समज त्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राऊत यांचा काँग्रेसला चिमटाशिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी इम्रान यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसला चिमटा काढला. काँग्रेसने स्थानिक उमेदवार दिला असता तर पक्षाला अधिक बळकटी मिळाली असती. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांची देशभरात सोय लावली आहे. असे नेते संसदेत सरकारला जोरदार प्रत्युत्तर देतील, असा काँग्रेस पक्षाचा विश्वास असावा, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :काँग्रेसराज्यसभापृथ्वीराज चव्हाण