सुनील बर्वे, अभिनेतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विलेपार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृह माझ्यासाठी होम ग्राउंडच आहे. कारण दीनानाथच्या कट्ट्यावर मित्रांसोबत खूप टाइमपास केला आहे. विनय आपटे, सचिन खेडेकर, विश्वास सोहोनी, पुष्कर श्रोत्री, समीर चौघुले दीनानाथच्या कट्ट्यावर जमायचो. त्यामुळे कट्टा, नाट्यगृह आणि रंगमंच खूप जवळचे आहे. दीनानाथचे डिझाइन खूप छान आहे. मध्यंतरी ॲकॉस्टिक्सचा प्रॉब्लेम झाला होता; पण आता सुधारण्यात आला आहे. रंगमंचाच्या दोन्ही बाजूला असलेली विंगेतील जागा परफेक्ट आहे. प्रेक्षक आणि रंगमंचातील अंतर खूप कमी असल्याने विनोदीच नव्हे, तर गंभीर नाटकांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. रसिकांचा सुस्काराही आमच्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे दीनानाथ परफॉर्म करण्यासाठी खूपच उत्तम आहे. मध्यंतरी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तक्रारींचे निवारण न झाल्याने ते नेमके कशावर खर्च करण्यात आले, असा प्रश्न पडतो.
मेकअप रुम्स जिथे आणि जशा असायला हव्यात तशाच दीनानाथमध्ये आहेत. स्टेज आणि मेकअप रूममध्ये गल्लीसारखी जागा आहे. त्यामुळे मेकअप रूममध्ये कलाकारांची धमाल सुरू असली तर ती स्टेजवर ऐकू जात नाही. नाट्यगृहात प्रवेश करताना बऱ्याच पायऱ्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्या चढताना त्रास होऊ नये यासाठी लिफ्ट आहे. मध्यंतरी दीनानाथचे नूतनीकरण करण्यात आले तेव्हा आसनव्यवस्था आणि वातानुकूलित यंत्रणेसह बऱ्याच गोष्टी बदलण्यात आल्या. त्यानंतरही बऱ्याच तक्रारी आहेत. अगोदर तिकीट काउंटर पायऱ्या चढून गेल्यावर होते. ते आता खाली पार्किंगच्या जागेत आणले आहे. त्यामुळे पार्किंगची जागा अडली गेली. पायऱ्यांच्या खालची जागा बुकिंग काउंटरसाठी वापरता येऊ शकेल. त्यामुळे पार्किंगची जागा वाढेल. सेट्सची ने-आण करणारा ट्रक किंवा टेम्पो पार्किंगमधून मागे न्यावा लागतो. त्याऐवजी मागच्या प्रवेशद्वारानेच तिकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली, तर सोपे होईल. या अडचणींमुळे दीनानाथ नाट्यगृह गुदमरल्यासारखे झाले आहे. आजूबाजूचा परिसर मोकळा केल्यास दीनानाथचा श्वास कोंडणार नाही.
स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या मेकअप रुम्स सुसज्ज आहेत. कपडे बदलण्यासाठी वेगळे दालन आहे. त्यामुळे कोणी कलाकारांना भेटायला आल्यास संकोच वाटत नाही. स्वच्छ प्रसाधनगृहे असावीत ही महानगरपालिकेकडून माफक अपेक्षा आहे. मार्बल लावलेल्या चकाचक स्वच्छतागृहाचा अट्टहास नाही; पण स्वच्छता हवी. खिडक्यांना लावलेल्या ॲल्युमिनिअमच्या तावदानातून काचा निखळल्याचे आढळले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च कशावर करण्यात आला? ते समजत नाही.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया... काही दिवसांपूर्वी बरेच महिने पुरुष प्रसाधनगृह बंद होते. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी जिने चढून वरच्या मजल्यावर जावे लागायचे. आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते गैरसोयीचे होते.इथे नाटक पाहायला वेगळीच मजा येते. प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता असली तरी त्याकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे. अत्याधुनिक पार्किंग पद्धती अवलंबल्यास आणखी गाड्या पार्क करता येतील.
कलाकारांना मानाची वागणूक द्यायला हवीनाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी निर्मात्यांना मनपाच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जावे लागते हे अतिशय गैरसोयीचे आहे. भाड्यासह डिपॉझिट्सचे पैसे नाट्यगृहामध्येच स्वीकारायला हवेत. जीएसटीसोबतच इतर आर्थिक व्यवहार तिथेच व्हावेत. मेकअप आणि तयारीसाठी प्रयोगापूर्वी लवकर येणाऱ्या कलाकारांना बाहेर थांबवून ठेवले जाणे खूप दुर्दैवी आहे. कलाकारांना मानाची वागणूक द्यायलाच हवी. दहा मिनिटे उशीर झाल्यास लेट चार्ज भरायला लावला जातो यावर विचार व्हायला हवा.