Join us

'आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय, दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार'; एकनाथ शिंदेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 4:10 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे.

मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. 

'शिवसेना आमचीच... यंदाचा दसरा मेळावा माझ्या जीवनातील सर्वात मोठा कार्यक्रम'

दसरा मेळावा केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याबाबत पुन्हा एकदा विधान केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या शिवसेनेत प्रवेश करताय. सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन झालेलं आहे, अशा लोकांच्या भावना आहेत. आम्हाला मिळालेलं पाठबळ वाढतंय. त्यामुळे आमचा दसरा मेळावा भव्य-दिव्य होणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवसेनेतील गळती सुरुच! ‘या’ २ जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक शिंदे गटात; नेत्यांना जबाबदारीही दिली

दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे