मुंबई : शहर आणि उपनगरांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असली, तरी त्याची नेमकी संख्या किती आहे याची अद्ययावत माहिती मुंबई पालिकेकडे उपलब्ध नाही. या माहितीसाठी मुंबई महापालिकेने येत्या एप्रिल महिन्यापासून भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी संस्थेची निवड होत नसल्याने सर्वेक्षणाचे काम रखडले होते. मात्र, आता मान्यताप्राप्त असलेल्या संस्थेची निवड केली आहे. जूनपासून भटक्या कुत्र्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून मुंबईत २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना झाली होती. मात्र, त्या वेळच्या आकडेवारीत आता मोठा फरक पडला आहे. विशेषकरून कोरोना काळात मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाविरोधात लढा देत होती.
भटक्या कुत्र्यांची दहशत
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून खूप त्रास होतो. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने त्यांचे अपघात होतात. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अहवाल सादर करणार
देशांत काम करणाऱ्या ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जूनपासून भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण होणार आहे. या संस्थेने जूनपासून पुढील ३ ते ४ महिन्यांत भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या अहवालात नेमकी संख्या कळणार आहे.