Join us

अनवाणी निघालेला संशयित निघाला वृद्धेचा मारेकरी!

By गौरी टेंबकर | Published: May 21, 2024 8:59 PM

मालाड पोलिसांकडून अटक.

मुंबई: मालाडमध्ये शांताबाई कुऱ्हाडे (८९) नावाच्या महिलेची हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी बैजू मुखिया (४५) नावाच्या इसमाला ७२ तास सखोल तपास करत अटक केली. त्याने चोरीच्या उद्देशानेच हा प्रकार केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुखीया हा बिगारी काम करून त्याचा उदरनिर्वाह चालवतो. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई राहत असलेल्या झोपडीमध्ये तो भाडेतत्त्वावर राहत होता. त्याच ठिकाणी १५ दिवसानंतर शांताबाई राहायला आली. मूखिया हा आसपासच्या परिसरातच राहायचा आणि झोपायचा. तिने १६ मे रोजी तिचा नातू सोनू याला फोन करून तिच्याजवळ १५ हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगितलेले जे मुखियाने ऐकले होते. शांताबाई ची हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी सीसीटीव्ही किंवा कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याने मारेकर्‍याची ओळख पटवणे हे मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे आणि त्यांच्या पथकासाठी मोठे आव्हान होते. शांताबाई चा मृतदेह सापडला त्या झोपडी पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या हालचाली बारकाईने पाहत त्यात अनवाणी चालत जाणाऱ्या मुखीयाला त्यांनी हेरले. शांताबाईची हत्या ही घराचा पत्रा उचकटून आत शिरत झाल्याने या घराचा ढाच्या माहिती असलेली व्यक्तीच हा प्रकार करू शकते असा संशय पोलिसांना होता. मुखिया त्यात झोपडीत राहत असल्याने त्याच्यावरील संशय बळावला आणि त्याच्याकडे चौकशी केली गेली. तेव्हा चोरीचा उद्देशाने त्याने शांताबाईची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान मुखिया आता पोलिसांच्या कोठडीत असून त्याचे कोणी साथीदार तसेच चोरलेल्या रकमेची चौकशी पोलीस करत आहेत.

टॅग्स :मुंबई