Video: सफाई कामगाराने सुप्रिया सुळेंना थांबवलं अन् म्हणाला, पवारसाहेबांनी...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 11:51 AM2023-05-03T11:51:57+5:302023-05-03T11:55:15+5:30
शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
मुंबई - मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या "लोक माझे सांगाती" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या", अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या. तर, काही काळासाठी युवा कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. राज्यभरात पवारांच्या या निर्णयाचे पडसाद पाहायला मिळाले.
शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी राजीनामा सत्रही सुरू झालं होतं. धाराशिव आणि बुलडाणा जिल्ह्याच्या प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता. मात्र, अजित पवार यांनी तात्काळ मीडियाच्या माध्यमातून हे राजीनामे थांबवण्याचे आवाहन केले. शरद पवार यांच्यासमेवत बैठक घेऊन वरिष्ठ नेते त्यांच्याच मार्गदर्शनात पुढील निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी भावनिक होऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांचा आक्रोश आणि भावनिकता कायम असल्याचं दिसून येतं.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, मॉर्निंग वॉकसाठी मुंबईच्या रस्त्यावर फिरत असताना त्यांना चक्क एका सफाई कामगाराने विनंती केली. ताई, साहेबांना निर्णय बदलायला सांगा, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच असायला हवेत. कारण, पवार साहेबांचे विचार हे शाहू-फुले-आंबेडकरांचेच विचार आहेत, असे संदेश पवार यांनी म्हटलं. संदेश पवार हे मूळचे राजापूरचे असून सध्या मुंबईतील रेसकोर्स परिसरात बीएमसीचे सफाई कामगार म्हणून ते कार्यरत आहेत.