Join us

टॅग केलेले कासव पाेहोचले मंगळुरूला!, कासवाच्या प्रवासाचे रहस्य उलगडतेय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 7:15 AM

सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आलेल्या समुद्री कासवांचा प्रवास जोरदार सुरू असून, त्यांच्या भ्रमंतीद्वारे मनोरंजक माहिती समोर येत आहे.

मुंबई :

सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आलेल्या समुद्री कासवांचा प्रवास जोरदार सुरू असून, त्यांच्या भ्रमंतीद्वारे मनोरंजक माहिती समोर येत आहे. आता या कासवांपैकी प्रथमा नावाच्या कासवाने गुजरातचा समुद्र गाठला असून, रेवा नावाचे कासव थेट मंगळुरुपर्यंत पोहचले आहे. तर सावणी आणि वनश्री या कासवांनीदेखील आपला रोख दक्षिणेकडे वळविला आहे.

वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एकूण ५ कासवांना अशा प्रकारे सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत. कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र वन विभागमार्फत कासवांच्या सागरी स्थलांतरण मार्गाचे उपग्रहीय निरीक्षण या वैज्ञानिक प्रकल्पाकरिता भारतीय वन्यजीव संस्थानला अनुदान दिले गेले आहे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किनाऱ्याजवळील सागरी भ्रमणाबाबत माहिती मिळण्यास मदत होत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांवर उपग्रहीय (सॅटेलाईट) टॅग लावण्याचा पश्चिम किनाऱ्यावरचा पहिलाच प्रयोग आहे. या टॅगद्वारे कासवांच्या स्थलांतरणाची नियमित माहिती मिळत आहे.

- ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विखुरलेली आढळतात.- आजतागायत ऑलिव्ह रिडले कासवांचे टॅगिंग फक्त भारताच्या पूर्व किनाऱ्यावरच होत आले आहे.- आता या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांचे पश्चिम किनाऱ्याजवळील पाण्यातील मार्गांतरण कळण्यास मदत होईल.

असा झाला प्रवास२५ जानेवारी रोजी प्रथमा हे पहिले कासव वेळास येथे आणि सावनी हे दुसरे कासव आंजर्ले येथे टॅग करण्यात आले. उर्वरित ३ कासवे रत्नागिरीतील गुहागर येथे टॅग करण्यात आली. वनश्री या कासवाला १५ फेब्रुवारी तर रेवा आणि लक्ष्मी या कासवांना १६ फेब्रुवारी रोजी टॅग लावण्यात आले.