ताज महल हॉटेलवर दिवसभर दुःखाचे मळभ...

By मनोज गडनीस | Published: October 11, 2024 10:20 AM2024-10-11T10:20:26+5:302024-10-11T10:21:32+5:30

सकाळ आणि दिवसाच्या अन्य पाळीतल्या कर्मचाऱ्यांनी देखील एनसीपीएमध्ये जाऊन आपल्या बिग बॉसला अभिवादन केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

the taj Mahal hotel is full of sadness all day after sad demise of ratan tata | ताज महल हॉटेलवर दिवसभर दुःखाचे मळभ...

ताज महल हॉटेलवर दिवसभर दुःखाचे मळभ...

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सन १९०३पासून मुंबईच्या शिरपेचातील मानाचा तुरा अशी ओळख असलेल्या टाटांच्या मालकीच्या ताजमहल हॉटेलवर जेव्हा रतन टाटा यांच्या निधनाची बातमी धडकली तेव्हा तेथील वातावरणा औदासिन्य . बुधवारी रात्री उशीरा ही बातमी आली आणि त्यानंतर सकाळी त्यांचे पार्थिव एनसीपीएमध्ये अत्यंदर्शनासाठी ठेवण्याचे टाटा समुहाच्या व्यवस्थापनाने जाहीर केल्यानंतर हॉटेलमध्ये रात्रपाळीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी ड्युटी संपल्यावर थेट एनसीपीए गाठले. सकाळ आणि दिवसाच्या अन्य पाळीतल्या कर्मचाऱ्यांनी देखील एनसीपीएमध्ये जाऊन आपल्या बिग बॉसला अभिवादन केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

ताज हॉटेलमधले दिवसभराचे चित्र मात्र औदासिन्याने भरले होते. आपल्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती गेल्याच्या दुःखाची सल जाणवत असल्याचे एका कर्चमाऱ्याने सांगितले. काही ग्राहक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रतन टाटा यांच्याशी कधी संपर्क आला का, तुमचा अनुभव कसा होता अशी चौकशी देखील करत असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. नवीन ताजमधून जुन्या ताजमध्ये जाण्यासाठी असलेल्या लॉबीच्या रस्त्यात टाटा परिवाराच्या आठवणीची एक सुंदर शो केस आहे. जे आर डी टाटा, रतन टाटा यांचे विविध मान्यवरांसोबतचे फोटो तिथे लावले आहेत. काही ग्राहक या शोकेसपाशी घुटमळत त्याचे फोटो काढत होते. तर टाटा आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या फोटोसोबत स्वतःचे सेल्फी देखील काढताना दिसत होते. हॉटेलच्या लॉबीत बसल्यानंतरही रतन टाटा हा विषय ऐकू येत होता. 

नारायण पंडित नावाचे एक ग्राहक आज तिथे मुद्दाम आले होते. ते म्हणाले की, मी रात्री अनेकवेळा इथे कॉफीसाठी येतो किंवा दिवसभरातही मीटिंगसाठी येणे होते. कित्येकवेळा मी रतन टाटा यांना इथे पाहिले आहे. काहीवेळा तर ते स्वतः इंडिका किंवा नॅनो अशी छोटी गाडी चालवत यायचे. ते दृष्य बघण्यासारखे असायचे. कारण ते दिसले की कर्मचाऱ्यांची धावपळ उडायची. ते मात्र एखादी अन्य व्यक्ती हॉटेलमध्ये यावी तितक्या सहजतेने यायचे. आपण मालक असल्याचा कुठलाही आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर नसायचा. शहराचा दिमाख वाढवणाऱ्या ताज हॉटेलमध्ये आज रोजची चहलपहल असली तरी त्याची गती मात्र मंदावल्याचे जाणवत होते.

 

Web Title: the taj Mahal hotel is full of sadness all day after sad demise of ratan tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.