मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून लागला वाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:21 PM2022-07-14T22:21:49+5:302022-07-14T23:39:03+5:30

मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.    

The Tansa lake, which supplies water to Mumbai, overflowed and began to flow | मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून लागला वाहू

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून लागला वाहू

googlenewsNext

मुंबई- मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक १४ जुलै २०२२) रात्री ८.५० वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण ३८ दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री ९.५० पर्यंत ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

काल (दिनांक १३ जुलै २०२२) मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. म्हणजेच, यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी २ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.    

तानसा तलावाचा विचार करता, गतवर्षी दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता तर त्याआधीच्या वर्षी दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन हा तलाव वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे.

धरणाखालील या वाहत्या पाण्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून ठाणे व पालघर जिल्हा प्रशासनाने या तानसा नदीच्या काठावरील गांवाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीपात्रात उतरण्यास व पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरील प्रशासन या नदी काठावरील गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून नदी पात्रात कोणी उतरणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. या तानसा नदीच्या काठावर ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३३ गावे याया तानसा नदी काठावर आहेत. या ३३ गावांपैकी १८ गांवे ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी तालुक्यातील आहेत.  तर उर्वरित १५ गावे पालघरच्या वाडा तालुक्यातील आहे. या ३३ गावांतील ग्रामस्थांना महसूल यंत्रणेसह ग्राम पंचायत कर्मचार्यांच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय या नदी पात्रातील वाहत्या पाण्यात उतरण्यास, पोहण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: The Tansa lake, which supplies water to Mumbai, overflowed and began to flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.