शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 12:43 PM2022-09-07T12:43:28+5:302022-09-07T12:44:04+5:30

शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले.

The target of the Shinde group is now Mumbai Municipal Corporation | शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

Next

ठाणे : भाजपच्या बड्या नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळविण्याकरिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खेटे घालणे सुरू केल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील टीमने मुंबई महापालिकेतील ठाकरे यांच्या गटातील नगरसेवक फोडण्याकरिता कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे मासे गळाला लावण्याकरिता या टीमचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई व इतर महापालिकांतील असंख्य नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. जे नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले. 
ठाण्यातील आपला गड ताब्यात घेतल्यानंतर आता शिंदे गटाने मुंबईकडे लक्ष केंद्रित केले.

 त्यासाठी ठाण्यातील एक टीम सध्या मुंबईच्या मोहिमेसाठी कामाला लागली असल्याची माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील अनेक मंडळांना आणि घरगुती गणपतींना भेटी दिल्या. आता शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे खंदे समर्थक मुंबईच्या मोहिमेवर  आहेत. ही टीम मुंबईत जाऊन ठाकरे गटाच्या नगरसेवकांशी संपर्क साधत आहे. शिंदे हेच कशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेत आहेत, याची माहिती देत आहेत. शिंदे यांनी उचललेले पाऊल कसे योग्य आहे, त्यांनी हे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले आणि त्यांना साथ देण्याची गरज का आहे, याची चर्चा हे पदाधिकारी करीत आहेत.

भाजप-मनसे वाढवू शकते डोकेदुखी
-    मुंबई महापालिका हा शिवसेनेचा मुख्य आधार मानला जात आहे. भाजप त्याकरिता मनसेकडे आशेने पाहत आहे. 
-    शिंदे यांचे वर्चस्व ठाण्यात असल्याने मुंबईत राज यांना जवळ करणे ही भाजपची गरज असल्याचे हेरून आता मुंबईतही ठाकरे यांची शिवसेना आम्हीच फोडू शकतो हे शिंदे गटाला दाखवून द्यायचे आहे. 
-    भाजप-मनसे फार जवळीक शिंदे गटाची डोकेदुखी वाढवू शकते. त्यामुळे शिंदे गटाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. 
-    किती नगरसेवक गळाला लागणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
 

Web Title: The target of the Shinde group is now Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.