Join us

टास्क पैसे कमविण्याचे नव्हे, बँक खाते रिकामे करण्याचे; ऑनलाइन पार्टटाइमच्या सापळ्यात अडकू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 2:24 PM

लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाल

मुंबई : सायबर भामट्याकडून ऑनलाईन पार्टटाइम जॉबच्या नावाखाली व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देत फसवणूक होत आहे.  अशा टास्कला बळी पडून अनेकांचे बँक खाते रिकामे झालेय. त्यामुळे या सापळ्यात अडकू नका, असे आवाहन मुंबई सायबर पोलिस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांनी शुक्रवारी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक करणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले आहे.

लाइक्सच्या ५०-१०० साठी लाइफची कमाई गमवाल !-  कोलाबा पोलिसांच्या हद्दीतही एका इंटेरियर मॅनेजरला ऑनलाइन टास्क रोड यूट्यूब लाईकच्या माध्यमातून जवळपास २५ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा चुना लावला -  याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे, ज्यांची नावे मिलिंद शेट्टे (वय ५५), गोरबहादूर सिंग (५२), संतोष शेट्टे (४८), लक्ष्मण सीमा (३७), गुप्ता खान आणि तुषार आजवानी (३८) अशी असून असून अधिक तपास अधिकारी समीर लोणकर आणि प्रकाश गवळी व पथक करत आहे.

 यूट्युब लाइक करा, पैसे कमवा --   स्नेह शक्तावत ऊर्फ आदित्य जैन (२४), महावीर सिंह दारोगा ऊर्फ रोशन (२२) आणि देव गुर्जर (२७) अशी राजस्थानी टोळीतील आरोपींची नावे असून तिघांचा शोध सुरू आहे.  व्हाॅट्सॲपद्वारे ‘यूट्युब लाइक करा, पैसे कमवा’ अशी जाहिरात टाकत नोकरी करताना अधिक पैसे कमावण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखविले. -  टेलिग्रामवरून लिंक पाठवत टास्क देऊन २७ लाख २० हजार ९०० रुपयांचा चुना लावला. -  या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक महेश जाधव आणि निरीक्षक वैशाली श्रावगी यांनी तांत्रिक तपास करत मीरा रोड भाईंदर परिसरातून या त्रिकुटाला गजाआड केले. 

मोठ्या शिताफीने पूर्व विभाग सायबर पोलिसांनी राजस्थानी टोळीला अटक केली. नोकरीची जाहिरात करत या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे. 

आधी फायदा मग फटका-   टास्क प्रकरणांमध्ये तिघांना अटक केली आहे. ज्यांची नावे कल्पेश मेढेकर (वय २७), मनोज नेरुरकर (३८) आणि सुभाष नागम (४५) अशी असून त्यांनी घाटकोपरमधील व्यक्तीला व्हाॅट्सॲपमार्फत गुंतवणूक करायचे आमिष दाखवत सुरुवातीला फायदा मिळवून दिला आणि नंतर त्यांना १० लाख ८७ हजार रुपयांना फसवण्यात आले. -  त्याचा तपास पोलिस निरीक्षक शीतल मुंढे करत आहेत. त्यांच्याकडून इम्पोर्टर एक्सपोर्टर कोडच्या सर्टिफिकेट झेरॉक्स प्रती, जीएसटी प्रमाणपत्राच्या प्रती, २१ चेक बुक ४३ विविध कंपन्यांचे स्टॅम्प, १३ आधार कार्डच्या झेरॉक्स व ११ व ९ पॅन कार्ड झेरॉक्स हस्तगत करण्यात आली.

टॅग्स :सायबर क्राइममुंबईपोलिस