श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काही वाहतूक संघटनांनी मुद्दाम टुरिस्ट, टॅक्सी, रिक्षा येत्या २५ तारखेला बंद ठेवण्याची अफवा उठवली आहे. कोणालाही विश्वासात न घेता हा बंद त्यांनी मुद्दाम पुकारला आहे. बंदचे कारणही अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अशा समाजघातक वाहतूक संघटनांच्या टॅक्शी बंद ला आमचा पाठिंबा नसल्याचे महाराष्ट्र चालक मालक समन्वय समितीने सोमवारी जाहीर केले. अशा संघटनांवर कारवाई करण्याची मागणीही चालक मालक समन्वय समितीने यावेळी केली.
टुरिस्ट, टॅक्सी, रिक्षा येत्या २५ तारखेला बंद ठेवणार, अशी अफवा काही वाहतूक संघटनांनी प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर व्हिडियोच्या माध्यमातून उठवली आहे. त्यावर ११ संघटनांची समिती असलेल्या महाराष्ट्र चालक मालक समन्वय समितीने पत्रकार संघात परिषद घेत याबाबत खुलासा केला. यावेळी समितीचे संजय नाईक,फ्रेडरिक डिसा, सुनील बोरकर, नेमीचंद पवार, हर्षल गायकवाड, सुधीर बोरगे आदी मान्यवर उपस्थित होते. अशा बंदच्या मॅसेजमुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर सणासुदीच्या दिवसांमध्ये असे बंद पाळण्यात आले तर रिक्षा टॅक्सी चालकांच्या कुटुंबियांचे उदरपोषणाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे अशा संघटनेचा आणि अफवा पसरविण्याऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी समितीने केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ, मुंबई टॅक्सीमेन युनियन, मुंबई रिक्षामेन्स युनियन, महाराष्ट्र अँप बेस्ड टँक्सी चालक मालक सेना, संघर्ष टुरिस्ट चालक मालक संघ, महाराष्ट्र चालक मालक ट्रान्सपोर्ट युनियन, बघतोय रिक्षावाला, ए सी एम, छत्रपत्री वाहतूक सेना, महाराष्ट्र टुरिस्ट परमिट युनियन सहभागी झाले होते.