Join us

मतदार यादीतून शिक्षकच झाले बाद..! विद्यापीठाचा निवडणूक प्रक्रियेतही गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 12:41 PM

मुंबई विद्यापीठात विविध प्राधिकरणांच्या आगामी निवडणुकांसाठी नोंदणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठात विविध प्राधिकरणांच्या आगामी निवडणुकांसाठी नोंदणी सुरू असताना शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीतून एकाचवेळी हजाराहून अधिक शिक्षकांच्या नोंदणी बाद ठरविण्याचा प्रकार समोर आला आहे.

कागदपत्रांची पूर्तता नाही, नोंदणी अर्जावर फोटो आणि सह्या नसणे अशी करणे देत विद्यापीठाच्या निवडणूक समितीकडून शिक्षकांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. मात्र, बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनकडून (बुकटू) निवडणूक समितीच्या या कार्यवाहीवर तीव्र आक्षेप नोंदवला असून, विद्यापीठ प्रशासनाच्या निवडणूक प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुकटूकडून प्रभारी कुलगुरू दिगंबर शिर्के यांना पत्र देण्यात आले असून, तत्काळ पात्र शिक्षकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून शिक्षक मतदारसंघाकडून १४ ऑक्टोबर रोजी नोंदणी सुरू करण्यात आली. त्यानंतर ६ मार्च रोजी नोंदणी केलेल्या मतदारांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये मुंबई विद्यापीठातील केवळ २ हजार ३०३ शिक्षकांचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर जवळपास १ हजार ३८१ शिक्षक मतदारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. प्रारूप मतदार यादीतील आक्षेपांनंतर मतदारांनी आवश्यक ती कार्यवाही करून अर्जात बदल केले. मात्र पुन्हा २९ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीतही केवळ २ हजार ३०६ मतदारांचे अर्ज निश्चित करण्यात आले.

दरम्यान,  शिक्षकांची आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर दिसत असताना निवडणूक समितीला ती कशी दिसत नाहीत, असा प्रश्न बुकटूकडून उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाचा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही.

मतदानाच्या हक्कावर घाला

  • शिक्षक मतदारांची चूक नसताना त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बाद करून विद्यापीठ निवडणूक समिती त्यांच्या मतदानाच्या हक्कावर घाला घालत असल्याचा ठपका बुकटूकडून ठेण्यात आला आहे. 
  • सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या अधिनियमानुसार कुलसचिवांना निवडणूक समितीच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर बदल करण्याचा अधिकार असल्याने बुकटूकडून यावर कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. 
  • अचूक कागदपत्रे आणि कार्यवाही केली आहे अशांचा मतदार यादीत समावेश करावा.
टॅग्स :मुंबई विद्यापीठ