मुंबई: वांद्रेतील एका ४८ वर्षीय शिक्षिकेने वाईन शॉपमधून दारूची ऑर्डर दिली. त्यांना डिलिव्हरी मिळाली नाही पण दीड हजाराच्या दारूसाठी जवळपास ३१ हजारांचा चुना लावण्यात आला. याप्रकरणी त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
तक्रार नेहा (नावात बदल ) या एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना पेरी वाईन्स नावाच्या शॉप मधून दारू ऑर्डर करायची होती. त्यासाठी त्यांनी गुगलवर त्याचा नंबर सर्च करत फोन केला. फोन उचलणाऱ्याने दारूची ऑर्डर घेतली आणि एक नंबर पाठवत त्यावर १५०० रुपये जी पे द्वारे पाठवायला सांगितले.
नेहा यांनी पैसे पाठवले आणि त्यांना फोनवर असलेल्या इसमाने २९९९१ हा कोड जी पे वर टाकायला सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार नेहा यांनी तो कोड टाकला आणि त्यांच्या खात्यातून २९ हजार, ९९१ रुपये वजा झाले. त्यानंतरही फोनवरील इसम वेगवेगळी कारणे देऊन अधिक पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे नेहा यांनी त्याला फोन केला तेव्हा त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. या विरोधात त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.