Join us

महानगराचा पारा ३७ अंश सेल्सिअस पार; मान्सूनपूर्व पावसाने वाढले तापमान, मुंबईकर हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:38 AM

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरात उष्णतेची लाटेची शक्यता आहे. 

मुंबई : मान्सूनपूर्व पावसानंतर वाढलेल्या कमाल तापमानानेमुंबईकरांना हैराण केले आहे. दोन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, गुरुवारीही कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मे मध्येही उष्णतेच्या लाटेने मुंबईकरांना नकोसे केले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहर व उपनगरात उष्णतेची लाटेची शक्यता आहे. 

दुपार, सायंकाळनंतर वादळी वाऱ्यासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३७, २६ अंशाच्या आसपास राहील. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण व दमट परिस्थिती राहील. कोकण व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, वारा वाहील. हलका ते मध्यम पाऊस पडेल.

मुंबई हे समुद्र किनाऱ्यावरील शहर आहे. जेव्हा आर्द्रता खूप असते, तेव्हा तापमान ३७ अंश असले तरी ते ३९ अंश असल्याचे जाणवते किंवा दोन ते तीन अंश तापमान जास्त जाणवते. समुद्र काठच्या शहरामुळे आर्द्रता जास्त नोंदविली जात असून, आता कमाल आर्द्रता ७२ ते ८० आहे.- सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग

बुधवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये-

मुंबई       ३७.२ बीड        ३७.३ डहाणू     ३७.५ जळगाव  ४२ मालेगाव  ४० नाशिक   ३८.३ धाराशिव ३७.८ पालघर    ३७.८

टॅग्स :मुंबईतापमान