Join us

महाराष्ट्रात मराठीच! घाटकोपरमधील उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटाने तोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 11:38 AM

'मारु घाटकोपर' असं लिहलेल्या या बोर्डची सोशल मीडियावर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती.

मुंबई: मुंबईतील घाटकोपरमध्ये एका उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडून टाकण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे गुजराती बोर्ड तोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं. या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली. 

'मारु घाटकोपर' असं लिहलेल्या या बोर्डची सोशल मीडियावर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. तसेच यावरून वादही सुरू होता. या मराठी-गुजराती भाषेच्या वादात हा बोर्ड तात्काळ हटवला जावा अशी मागणी महापालिकेकडे केली जात होती. आता ठाकरे यांच्या शिवसेनेने हा बोर्ड काढून टाकला असून या जागेवर जय महाराष्ट्र, माझं घाटकोपर, उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर असलेला बोर्ड लावण्यात आला.

लोकमत मुंबईने 'घाटकोपरची स्थानिक भाषा गुजराती? BMC चा जावईशोध!' या मथळ्यानं बातमी लावली होती. त्यानंतर एका रात्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारू घाटकोपर असलेली ही अक्षरं उध्वस्त केलीत आणि तिथे माझे घाटकोपर असा मराठी फलक लावला आहे. मराठी भाषिक महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जर अशा पद्धतीने मराठीची गळचेपी होत असेल तर प्रश्न हा उपस्थित होतो की या प्रशासकीय अधिकाऱ्यांना राजभाषा मराठी बद्दल आपुलकी उरली आहे की नाही? एकीकडे मुंबईतून मराठी माणसाचा टक्का कमी होत असताना असे प्रकार घडणं दुर्दैव! अशी भावना शिवसेना उबाठा गटानं व्यक्त केली आहे.

टॅग्स :मराठीउद्धव ठाकरेशिवसेनामुंबई महानगरपालिका