Join us

द. मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे? अरविंद सावंत यांना नांदगावकर आव्हान देण्याची शक्यता 

By संतोष आंधळे | Published: March 24, 2024 1:01 PM

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.

मुंबई : भाजपप्रणीत महायुतीत सहभागी होण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने आता प्रचाराच्या मैदानात नवा भिडू पाहायला मिळणार आहे. या पक्षाला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ठाकरे विरुद्ध ठाकरे हा जुनाच संघर्ष नव्या पटावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीलाही लागले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू साथीदार असलेल्या बाळा नांदगावकर यांना या मतदारसंघातून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी राज मैदानात उतरतील तर सावंत यांच्यासाठी उद्धव प्रचार करतील. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमधील प्रचारयुद्ध मतदारांना अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला करावा लागेल प्रचारअरविंद सावंत हे ठाकरे गटाचे जुने नेते आहेत. त्यांनी संघटनेत अनेक वर्षे काम केले असून दोनवेळा या मतदारसंघाचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले आहे. काही महिने ते केंद्रात मंत्रीही होते. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत सावंत युतीचे उमेदवार होते; मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, गेल्या काही वर्षांत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेल्यामुळे वेगळी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. नवीन मित्रपक्षांच्या सोबतीने त्यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे.

मनसे पक्षात बाळा नांदगावकर वरिष्ठ नेते आहेत. चारवेळा आमदार असलेले नांदगावकर यांनी यापूर्वीही दोनदा या लोकसभा मतदारसंघातून आपले नशीब अजमाविले होते; मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. नांदगावकर यांना हा मतदारसंघ नवीन नाही. मराठी पट्ट्यात विशेष करून त्यांना त्यांच्या पक्षाच्या भूमिकेचा फायदा होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये मनसे पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे नांदगावकर यांना पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणावरून लढवणूक लढविताना चांगला संघर्ष करावा लागणार आहे. मनसे पक्ष स्थापनेनंतर आजपर्यंत कुठल्याच पक्षाशी युती केली नव्हती. युती करण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे त्याचा फायदा उमेदवार निवडीसाठी होऊ शकतो.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४