Join us  

केअर टेकर महिलेकडून दागिन्यांची चोरी! योगा शिक्षिकेची बांगुरनगर पोलिसात धाव 

By गौरी टेंबकर | Published: February 26, 2024 6:44 PM

...तेव्हा ते कुठेतरी पडून हरवले असेल असे वाटल्याने लक्ष्मी यांनी घरभर त्याचा शोध घेतला मात्र ते सापडलेच नाही. त्यानंतर ३१ जानेवारीला दुसऱ्या कानातले सोन्याचे फुल आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले तसेच ब्लूटूथही कुठे मिळत नव्हते.

मुंबई: वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी एका योगा शिक्षिकेने महिला केअर टेकरला कामावर ठेवले. मात्र तिने वृद्धच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिनेचोरी केले. याविरोधात त्यांनी बांगूरनगर पोलिसात तक्रार दिल्यावर अपर्णा बोधारे नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार लक्ष्मी व्ही (५१) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आई पार्वती (७८) यांच्या हालचालीमध्ये वृद्धापकाळमुळे एकदमच मंदपणा आला. त्यामुळे त्यांनी ५ जानेवारी, २०२४ रोजी अपर्णाला कामावर ठेवले होते. जी पार्वती यांना आंघोळ घालून फिरायला नेण्याचे काम करायची. तर दुसरी लिला नावाची महिलाही गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या कडे धुणीभांडी करत होती. लक्ष्मी या २९ जानेवारी रोजी बाहेरगावातून परत आल्यावर आईशी गप्पा मारत असताना तिच्या एका कानातले कर्णफुल हे गायब होते. तेव्हा ते कुठेतरी पडून हरवले असेल असे वाटल्याने लक्ष्मी यांनी घरभर त्याचा शोध घेतला मात्र ते सापडलेच नाही. त्यानंतर ३१ जानेवारीला दुसऱ्या कानातले सोन्याचे फुल आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गायब झाले तसेच ब्लूटूथही कुठे मिळत नव्हते.

याबाबत आईला विचारल्यावर तिला काही आठवत नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे याबाबत बोधारेला विचारणा करण्यात आली. मात्र तिला याबाबत काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे पार्वती यांच्या नाकातील चमकी कुटुंबीयानी काढून ठेवली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बोधारेने नाकातली चमकी गायब असल्याचे कुटुंबियांना सांगितले. तसेच ७ फेब्रुवारी रोजी व्हाट्सअपवर मेसेज करत ती कामावर येणार नसून तिने काम सोडल्याचे कळवले. मात्र दागिने सापडलेच नाहीत तेव्हा बोधारेवर संशय बळावला आणि ५५ हजारांच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :चोरपोलिसदागिने